रावेर तालुक्यात शिक्षकदिनानिमित्ताने शाळा आणि शिक्षक पुरस्कार जाहीर

रावेर प्रतिनिधी । शिक्षक दिनानिमित्ताने सालाबादप्रमाणे रावेर तालुका माध्यमिक शाळा व शिक्षक गौरव समितीच्या वतीने शाळा आणि शिक्षक पुरस्कार आज जाहीर करण्यात आले आहेत. तालुकास्तरीय आदर्श शाळा पुरस्कार तालुक्यातील तांदलवाडी येथील माध्यमिक विद्यालयास जाहीर करण्यात आला असून त्यासोबतच पाच माध्यमिक शिक्षकांचीही नावे जाहीर करण्यात आली आहेत.

निवड समितीच्या आज झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. त्यात उपमुख्याध्यापक तुळशीदास बाबुराव महाजन, सरदार जी जी हायस्कूल रावेर, श्रीमती प्रेमलता किशोर चौधरी, उपशिक्षिका, द. सो. पाटील माध्यमिक विद्यालय, केऱ्हाळा, अर्जुन जयराम सोळुंके, उपशिक्षक ग. गो. बेंडाळे हायस्कूल विवरा, लक्ष्मण मधुकर ठाकूर, उपशिक्षक, नूतन माध्यमिक विद्यालय चिनावल, अजीम खान रशीद खान, उपशिक्षक, खिजर उर्दू हायस्कूल, चिनावल या शिक्षकांची निवड आलेल्या प्रस्तावांतून करण्यात आली.

तालुक्यातील माध्यमिक शाळातील मुख्याध्यापक व शिक्षक संघटनांनी एकत्र येऊन ही गौरव समिती स्थापन केली असून गेल्या सोळा वर्षापासून ही समिती शाळा आणि शिक्षकांना पुरस्कार प्रदान करते. जिल्हा परिषदेने माध्यमिक शाळांच्या शिक्षकांना पुरस्कार देणे बंद केल्यापासून ही समिती पुरस्कार जाहीर करून प्रदान करते. मुख्याध्यापक आणि शिक्षक संघटनांनी एकत्र येऊन दिले जाणारे अशा प्रकारचे पुरस्कार हे राज्यातील एकमेव उदाहरण आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात योग्यवेळी पुरस्कार प्रदान केले जातील असे संयोजकांनी सांगितले.

 

 

 

 

Protected Content