अनिल देशमुखांच्या भोवती पाश आवळला; अटकेची शक्यता बळावली !

मुंबई प्रतिनिधी | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात ईडीने लूकआऊट नोटीस जारी करून त्यांना देश सोडण्यास बंदी केली आहे. यामुळे आता त्यांच्या अटकेची शक्यता बळावल्याचे दिसून येत आहे.

अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात १०० कोटींच्या वसुलीच्या आरोपाच्या संदर्भात लुकआऊट नोटीस जारी केली आहे. ही नोटीस जारी झाल्यामुळे अनिल देशमुख यांना देश सोडून जाता येणार नाही.

ईडीने अनिल देशमुख यांना आतापर्यंत पाच वेळा समन्स बजावले असून ते एकदाही चौकशीसाठी हजर झाले नाहीत. कायद्यानुसार उपलब्ध पर्यायांचा विचार करत असल्याचा दावा करत देशमुखांनी हजर राहण्यास नकार दिला होता. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना गेल्या महिन्यात या प्रकरणातील ईडीच्या कारवाईपासून अंतरिम स्थगिती देण्यास नकार दिला होता. यानंतर आता त्यांच्या विरोधात लूकआऊट नोटीस जारी करण्यात आल्याने देशमुख यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

दरम्यान, देशमुख यांच्या विरोधात लढा देणार्‍या ऍड. जयश्री पाटील म्हणाल्या की,१०० कोटी रुपये खंडणी घोटाळ्यात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अनिल देशमुख यांच्याविरुद्ध लूकआऊट नोटीस बजावली आहे. यामुळे आता देशमुख यांना देश सोडून जाता येणार नाही. लूकआऊट नोटीसनुसार अनिल देशमुख यांना देशभरातून शोधून काढण्याचे अधिकार मिळाले आहेत. त्याखेरीज देशभरातील विमानतळांनादेखील नोटीस गेली आहे. जेणेकरून देशमुख हे देश सोडून जाऊ शकणार नाहीत. तसा प्रयत्न त्यांनी केल्यास त्यांना विमानतळावरच थांबवले जाणार असल्याची माहिती जयश्री पाटील यांनी दिली आहे.

Protected Content