मतदानाच्या एक दिवस अगोदर व दिवशी वर्तमानपत्रासाठी दिल्या जाणाऱ्या राजकीय जाहिरातींचे पूर्वप्रमाणीकरण बंधनकारक- जिल्हाधिकारी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मतदानाच्या एक दिवस अगोदर (१२ मे) व मतदानाच्या दिवशी (१३ मे) प्रिंट मीडिया मधून राजकीय पक्ष व उमेदवारांच्या राजकीय जाहिराती जिल्हास्तरीय माध्यम सनियंत्रण व प्रमाणन समितीकडून पूर्व प्रमाणित करून घेणे बंधनकारक असून, त्यासाठी अशा जाहिरातींसाठी प्रकाशनाच्या प्रस्तावित तारखेच्या २ दिवस अगोदर अर्ज करावा लागणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

मतदानाच्या दिवशी (१३ मे) व मतदानाच्या एक दिवसपुर्वी (१२ मे) प्रिंट माध्यमांमधून कोणत्याही भडकाऊ, दिशाभूल करणाऱ्या किंवा द्वेषपूर्ण जाहिरातींमुळे कोणतीही अप्रिय घटना घडू नये, ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेला खीळ बसले अशा जाहिराती प्रकाशित होऊ नये, याबाबत दक्षता घेण्याचे भारत निवडणूक आयोगाने निर्देश दिले आहेत. कोणताही राजकीय पक्ष किंवा निवडणूक उमेदवार किंवा इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्ती यांनी मतदानाच्या दिवशी आणि मतदानाच्या एक दिवस आधी प्रिंट मिडीयामध्ये कोणतीही राजकीय जाहिरात, जोपर्यंत राज्य/जिल्हा स्तरावरील माध्यम पूर्व प्रमाणिकरण समितीकडून पूर्व-प्रमाणित केली जात नाही, तोपर्यंत वृत्तपत्रात प्रकाशित करुन नये. राजकीय पक्ष किंवा निवडणूक उमेदवार किंवा इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्ती यांना उक्त कालावधीत प्रिंट मिडीयामध्ये राजकीय जाहिरात द्यावयाची झाल्यास, सदर जाहिरात प्रकाशित करण्याच्या प्रस्तावित तारखेच्या 02 (दोन) दिवस आधी जिल्हास्तरीय माध्यम सनियंत्रण प्रमाणिकरण समितीकडे ‘माध्यम कक्ष’ , जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या शेजारी, जिल्हाधिकारी कार्यालय इमारत यांच्याकडे अर्ज करावा. भारत निवडणूक आयोगाच्या वरील निर्देशाचे काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी सर्व राजकीय पक्ष, उमेदवार, संबंधित संस्था व व्यक्ती यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहनही जिल्हानिवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

Protected Content