बोकड व बकऱ्यांची चोरी; पशूपालकाचा ३९ हजारांचा फटका

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील व्यंकटेश नगर परिसरातून एकाच्या ३९ हजार रूपये किंमतीच्या बोकड व बकऱ्यांची चोरी केल्याचा प्रकार सोमवार २३ ऑक्टोबर रोजी २ वाजेच्या सुमारास उघडकीला आला आहे. याप्रकरणी बुधवारी २५ ऑक्टोबर रोजी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञातचोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, जळगाव शहरातील व्यंकटेश नगरात विजयकुमार नंदलाल कुमावत (वय-४२) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खासगी वाहनचालवून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांनी दुय्यम व्यवसाय म्हणून बकऱ्या पाळलेल्या आहेत. सोमवारी २३ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेच्या सुमारास त्यांच्या घराच्या समोर ३९ हजार रूपये किंमतीचे दोन बोकड आणि दोन बकऱ्या बांधलेल्या असतांना अज्ञात चोरट्यांनी त्या चोरून नेल्या. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर बुधवारी २५ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक हेमंत कळसकर करीत आहे.

Protected Content