टिईटी घोटाळ्यात चाळीसगावचा शिक्षक अटकेत

पुणे प्रतिनिधी | शिक्षक पात्रता परिक्षा अर्थात टिईटी गैरव्यवहार प्रकरणात चाळीसगाव येथील शिक्षकाला अटक करण्यात आली असून यामुळे या घोटाळ्याचे धागेदोरे जळगाव जिल्ह्यापर्यंत पोहचल्याचे स्पष्ट झाले आहे.

गेल्या महिन्यात शिक्षक पात्रता परिक्षेतील घोटाळा उघडकीस आला असून या प्रकरणी निलंबित आयुक्त तुकाराम सुपे, जी.ए.कंपनीचा व्यवस्थापक अश्विनकुमार शिवकुमार, आशुतोष शर्मा, निशिद गायकवाड आदींना अटक करण्यात आली आहे. हा गैरव्यवहार २०१९ च्या परिक्षेतील असून याच प्रकारे आधीच्या वर्षी म्हणजे २०१८ मध्येही गैरव्यवहार करण्यात आल्याची माहिती आता समोर आली असून या संदर्भात पुणे सायबर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात पुणे सायबर पोलिसांच्या पथकाने नाशिक आणि चाळीसगाव येथून अनुक्रमे सुरंजित गुलाब पाटील (रा.तपोवन, नाशिक) आणि स्वप्निल तीरसिंग पाटील (रा.चाळीसगाव) यांना अटक केली आहे. दोघांनी मिळून ३५० परीक्षार्थींकडून सुमारे तीन कोटी ८५ लाख रुपये घेऊन ते एजंटमार्फत मुख्य आरोपींना दिल्याची बाब तपासात निष्पन्न झाली आहे. या दोन्ही संशयितांना प्रथमवर्ग न्यायलयात हजर केले असता न्यायदंडाधिकारी श्रद्धा डोलारे यांनी दोघांना १३ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

स्वप्निल तीरसिंग पाटील याने सुमारे १५० परीक्षार्थींकडून प्रत्येकी एक लाख दहा हजार रुपये असे दीड कोटी रुपये एजंटमार्फत आरोपींना दिल्याचे तपासात समोर आले आहे. सुरंजित पाटील व स्वप्निल पाटील यांचे मोबाइल पोलिसांनी जप्त केले असून त्याचे तांत्रिक विश्लेषण करून आणखी पुरावे हस्तगत केले जाणार आहेत. यात सखोल चौकशीतून संबंधीत घोटाळ्याची व्याप्ती नेमकी कुठवर पोहचली आहे ? याबाबत अजून माहिती मिळू शकणार आहे.

दरम्यान, टिईटी गैरव्यवहार प्रकरणी अटक करण्यात आलेला शिक्षक स्वप्नील तिरसिंग पाटील हा चाळीसगाव तालुक्यातील जामदा येथील मूळ रहिवासी असून सध्या चाळीसगावात धुळे रोडवरील शिक्षक कॉलनीत वास्तव्यास असून नांदगाव तालुक्यातील अमोदेच्या जि.प. शाळेत शिक्षक पदावर कार्यरत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून टिईटी घोटाळ्याचे तार हे जळगाव जिल्ह्यापर्यंत पोहचले असून काही मध्यस्थांनी याबाबत महत्वाची भूमिका निभावल्याची चर्चा होती. या पार्श्‍वभूमिवर स्वप्नील पाटील यांना करण्यात आलेली अटक लक्षणीय मानली जात आहे.

Protected Content