विद्यूत तारांच्या शार्टसर्कीटमुळे शेतातील पीक जळून खाक; शेतकऱ्याचे मोठे नुकसान

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील लमांजन येथील एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये आग लागल्याने पिकासह चारा जळून खाक झाल्याची घटना गुरूवार ९ मे रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली आहे. या आगीत शेतकऱ्याचे लाख रुपयांचे नुकसान झाले. शेतकऱ्याने पाच महिन्यापूर्वीच महावितरणला पत्र देऊन शेतात लोंबकळणाऱ्या तारा दुरुस्त करण्याबाबत विनंती केली होती. मात्र महावितरणने केलेल्या गंभीर दुर्लक्षामुळे शेतकऱ्याचे पीक व चारा जळून खाक झाला आहे.

जळगाव तालुक्यातील लमांजन येथील हिलाल नामदेव पाटील या शेतकऱ्याच्या शेतामध्ये कापूस पीक आणि चारा ठेवलेला होता. गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून त्याच्या शेतामध्ये काही विजेच्या तारा खाली आल्या होत्या. त्यामुळे त्याच्या पिकांसह जीवितहानीचा धोका निर्माण झाला होता. याबाबत हिलाल पाटील यांनी म्हसावद सबस्टेशन येथील सहाय्यक अभियंता यांना २५ नोव्हेंबर २०२३ रोजी पत्र दिले होते. संबंधित तारा दुरुस्त करून द्याव्यात अशी विनंती केली होती.

त्यानंतर मात्र महावितरणने या पत्राला केराची टोपली दाखवत गंभीर दुर्लक्ष केले. परिणामस्वरूप गुरुवारी ९ मे रोजी दुपारी २ वाजता हिलाल पाटील यांच्या शेतामध्ये आग लागली. हे आगीमध्ये त्यांचे कपाशीचे पीक आणि चारा जळून खाक झाला आहे. सुमारे १ लाख रुपये नुकसान शेतकऱ्याला झाले आहे. याप्रकरणी तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. याबाबत लवकरात लवकर पंचनामा करून हिलाल पाटील या नुकसानग्रस्त शेतकऱ्याला भरपाई मिळावी अशी मागणी लमांजन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.

Protected Content