अजितदादांच्या शुभेच्छांनी चर्चेला उधाण; ‘तो’ फोटो झाला व्हायरल !

मुंबई प्रतिनिधी । उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिलेल्या शुभेच्छांमधील फोटो हा चर्चेचा विषय ठरला असून सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

आज मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्तानं उद्धव ठाकरे यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही मुख्यमंत्र्यांना ट्विट करून शुभेच्छा दिल्या. यामध्ये त्यांनी बारामतीत झालेल्या कृषी प्रदर्शनातील फोटो ट्विट केला आहे. या फोटोत मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघे बसलेले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेनेचे पक्षप्रमुख, महाविकास आघाडीचे नेते उद्धवजी ठाकरे साहेबांच्या हिरकमहोत्सवी वाढदिवसानिमित्तानं त्यांचे मन:पूर्वक अभिष्टचिंतन! त्यांना निरोगी व दिर्घायुष्य लाभो, अशी प्रार्थना करतो. उद्धवजींच्या समर्थ, कुशल नेतृत्वाखाली कोरोनाविरुद्ध सुरु असलेला लढा आपण निश्‍चितंच जिंकू तसंच पुरोगामी, प्रगत विचारांच्या महाराष्ट्राला पुन्हा एकदा देशातील व जगातील अव्वल राज्य बनवू, असा मला विश्‍वास आहे, अशा शब्दात अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागील दोन दिवस सामनातून मुलाखत प्रसिद्ध झाली. या मुलाखतीत महाविकास आघाडीसंदर्भात कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी प्रश्‍न विचारला होता. त्याला उत्तर देताना उद्धव ठाकरे असं म्हणाले होते की, राज्यातील सत्ता तीन चाकांवर असली तरी त्याचे स्टेअरिंग माझ्या हाती आहे. दोघे (राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस) मागे बसलेले आहेत. अजित पवारांनी शुभेच्छा देताना ट्विट केलेल्या फोटो हा या विधानाला छेद देणारा आहे. कारण या फोटोत उद्धव ठाकरे आणि अजित पवार गाडीत बसलेले असून, स्टेअरिंग अजित पवारांच्या हाती आहे. त्यामुळे यावरून आता सोशल मीडियात धमाल चर्चा रंगली आहे.

Protected Content