Home Cities चोपडा चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीची आर्थिक झेप ; तब्बल ३.४७ कोटींचा निव्वळ...

चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीची आर्थिक झेप ; तब्बल ३.४७ कोटींचा निव्वळ नफा

0
6


चोपडा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीने गत आर्थिक वर्षात उत्पन्न आणि नफ्याचा नवा विक्रम नोंदवत आर्थिकदृष्ट्या भक्कम कामगिरी केली आहे. सभापती, उपसभापती आणि संचालक मंडळाच्या नियोजनबद्ध कारभारामुळे बाजार समितीला मागील आर्थिक वर्षात तब्बल ६ कोटी ३ लाख रुपयांचे एकूण उत्पन्न मिळाले असून त्यातून ३ कोटी ४७ लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला असल्याची माहिती सभापती नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. या उल्लेखनीय कामगिरीमुळे बाजार समितीच्या प्रगतीचा नवा अध्याय सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

बाजार समितीच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत सभापती नरेंद्र पाटील बोलत होते. यावेळी उपसभापती विनायक चव्हाण, संचालक सुनील जैन, ॲड. घनश्याम पाटील, ॲड. शिवराज पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि संचालक मंडळातील सदस्य उपस्थित होते. पत्रकार परिषदेत बोलताना नरेंद्र पाटील यांनी बाजार समितीच्या आर्थिक कामगिरीची सविस्तर माहिती दिली.

नरेंद्र पाटील म्हणाले की, चोपडा बाजार समितीला मागील आर्थिक वर्षात विक्रमी उत्पन्न मिळाले असून बाजार समितीच्या इतिहासात ही अत्यंत महत्त्वाची कामगिरी ठरली आहे. वाढत्या उत्पन्नासोबत निव्वळ नफाही लक्षणीय वाढला आहे. त्यामुळे आगामी काळात बाजार समितीच्या माध्यमातून विविध विकासकामांना चालना देण्यात येणार आहे. त्यात बाजार समिती परिसरात हायमास्ट दिव्यांची उभारणी तसेच सौरऊर्जा प्रकल्प सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. बाजार समितीने वार्षिक निव्वळ नफ्यातून पुन्हा मोठ्या प्रमाणात मुदत ठेव केली असून आतापर्यंत जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेत तब्बल ४ कोटी रुपयांच्या मुदत ठेवी जमा करण्यात आल्या आहेत. बाजार समितीच्या इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणावर मुदत ठेव करणारी ही पहिलीच समिती असावी, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

शेतकऱ्यांच्या सुविधेला प्राधान्य देत बाजार समितीने स्वतःचे जेसीबी मशीन खरेदी केले आहे. शेतकऱ्यांच्या शेतशिवारातील रस्ते तयार करण्यासाठी हे जेसीबी केवळ डिझेलच्या खर्चावर उपलब्ध करून दिले जात आहे. याशिवाय बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना विश्रांतीसाठी शेतकरी निवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. येथे शेतकऱ्यांना दोन वेळा चहाचीही व्यवस्था करण्यात आली असून या सुविधांचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला जात आहे. चोपडा बाजार समितीत शेतमालाला योग्य भाव मिळत असल्याने केवळ तालुक्यातीलच नव्हे तर आसपासच्या विविध तालुक्यांतील शेतकरीही आपला माल विक्रीसाठी येथे आणत आहेत. त्यामुळे बाजार समितीची व्यापारी उलाढाल वाढण्यास मदत झाली असून शेतकऱ्यांचा विश्वासही अधिक दृढ झाला आहे.

२४ मे २०२३ रोजी नव्या संचालक मंडळाची निवड झाल्यानंतर सभापतीपदी नरेंद्र पाटील आणि उपसभापतीपदी विनायक चव्हाण यांची निवड झाली होती. त्यानंतर संचालक मंडळाने घेतलेल्या नियोजनबद्ध निर्णयांमुळे बाजार समितीवरील कर्जाचे हप्ते नियमित फेडण्यात आले आणि त्याचवेळी उत्पन्न व निव्वळ नफ्यातही मोठी वाढ करण्यात यश आले. आर्थिक शिस्त आणि विकासाभिमुख धोरणांचा हा सकारात्मक परिणाम असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. या पत्रकार परिषदेला संचालक विजय पाटील, डॉ. अनिल पाटील, नंदकिशोर पाटील, मिलिंद पाटील, मनोज सनेर, रावसाहेब पाटील, नंदकिशोर सांगोरे, गोपाल पाटील, किरण देवराज, सचिव रोहिदास सोनवणे आणि सहसचिव जितेंद्र देशमुख यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound