मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगरसह परिसरातील बांधकाम कामगारांच्या नोंदणी प्रक्रियेत गंभीर गैरप्रकार होत असल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकृत निवेदन सादर केले आहे. नोंदणी प्रक्रियेत दलालांमार्फत मोठ्या प्रमाणावर आर्थिक शोषण होत असून, मुद्दाम त्रुटी ठेवून कामगारांकडून पुन्हा पैसे उकळले जात असल्याचा धक्कादायक प्रकार या निवेदनातून समोर आला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक रमेश मोतवाणी (पाटील) यांनी २३ एप्रिल रोजी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात या संपूर्ण प्रकाराची सविस्तर माहिती दिली आहे. मुक्ताईनगर तालुक्यासह परिसरातील अनेक बांधकाम कामगारांना नोंदणी प्रक्रियेदरम्यान गंभीर अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. विशेषतः, नोंदणीसाठी कामगारांना दलालांवर अवलंबून राहावे लागत असून, याच माध्यमातून आर्थिक शोषणाचा मोठा प्रकार सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

निवेदनानुसार, कामगारांच्या नोंदणी प्रक्रियेसाठी ₹1000 ते ₹2000 पर्यंत अवैध वसुली केली जात आहे. याहूनही गंभीर बाब म्हणजे अर्ज भरताना मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक, बँक खाते तपशील तसेच इतर महत्त्वाच्या माहितीमध्ये जाणूनबुजून चुका केल्या जातात. या चुका नंतर दुरुस्त करण्याच्या नावाखाली पुन्हा कामगारांकडून पैसे मागितले जात असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
याशिवाय, साध्या दुरुस्तीसाठी ५ ते ६ महिने विलंब लावला जात असल्याची तक्रार आहे. मात्र, दलालांना अतिरिक्त पैसे दिल्यास हेच काम काही मिनिटांत पूर्ण केले जाते, असा गंभीर आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण नोंदणी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासनातील पारदर्शकतेवरही शंका उपस्थित होत आहे.
या पार्श्वभूमीवर डॉ. मोतवाणी यांनी संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, कामगारांना न्याय मिळावा आणि नोंदणी प्रक्रिया पारदर्शक व सुलभ व्हावी, यासाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशीही मागणी त्यांनी केली आहे.



