जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील कंडारी येथे सांडपाण्याच्या पाईपलाईनचे आउटलेट काढण्यावरून झालेल्या वादातून एका तरुणाला आणि त्याच्या नातेवाईकाला दगडाने बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुनील राजधर धनगर (वय ३२, रा. कंडारी) हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्यास आहेत. मंगळवारी, २१ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास त्यांच्या शेजारी राहणारे नरेंद्र नारायण सोनवणे यांच्यासोबत सांडपाण्याच्या पाईपलाईनचे आउटलेट काढण्यावरून शाब्दिक वाद झाला. या वादाचे रूपांतर काही वेळातच हाणामारीत झाले.

यावेळी संशयित आरोपी नरेंद्र नारायण सोनवणे, भूषण नंदकिशोर सोनवणे, चेतन नरेश सोनवणे, नंदकिशोर नारायण सोनवणे, नरेश नारायण सोनवणे, ममता नरेंद्र सोनवणे आणि संगीता नंदकिशोर सोनवणे या सात जणांनी सुनील धनगर आणि त्यांच्या नातेवाईकांना दगडाने बेदम मारहाण केली. यात दोन्ही जखमींना गंभीर दुखापत झाली असून, आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली आहे.
या घटनेनंतर सुनील धनगर यांनी नशिराबाद पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून पोलिसांनी वरील सातही जणांविरुद्ध मारहाण आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हरीश पाटील हे करत आहेत.



