Home Cities जळगाव जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांची शाहूनगरमध्ये अचानक पाहणी ; कचरा टाकणाऱ्यांना दंड

जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांची शाहूनगरमध्ये अचानक पाहणी ; कचरा टाकणाऱ्यांना दंड

0
7


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील स्वच्छता, पाणीपुरवठा आणि सार्वजनिक जागांच्या व्यवस्थापनाबाबत महापौर दीपमाला मनोज काळे यांनी गुरुवारी (२२ ऑक्टोबर) महापौर स्वच्छता संकल्प अभियानांतर्गत प्रभाग क्रमांक ६ मधील शाहूनगर, ट्रॅफिक गार्डन आणि उर्दू शाळा क्रमांक १२ परिसराची अचानक पाहणी केली. या पाहणीदरम्यान विविध ठिकाणी आढळलेल्या अस्वच्छता, पाणीपुरवठा व्यवस्थेतील त्रुटी, शाळेच्या संरक्षण भिंतीची दुरवस्था आणि अतिक्रमणांच्या प्रश्नांवर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला. तसेच स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यासह आवश्यक कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

ट्रॅफिक गार्डन परिसरात उघड्यावर टाकण्यात येणारा कचरा उचलण्याचे काम सुरू असताना महापौरांनी परिसराची पाहणी केली. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यामुळे अस्वच्छता निर्माण होत असल्याचे लक्षात घेऊन त्यांनी यापुढे उघड्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांना प्रथम नोटीस द्यावी आणि त्यानंतरही नियमांचे उल्लंघन सुरू राहिल्यास दंडात्मक कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश दिले. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे आणि कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी, यावर त्यांनी भर दिला.

यानंतर महापौरांनी शाहूनगर येथील पाणीपुरवठा विभागाला भेट दिली. या वेळी कार्यालयात एकच कर्मचारी उपस्थित असल्याचे, तर इतर कर्मचारी अन्य कामांवर असल्याचे निदर्शनास आले. याबाबत त्यांनी हालचाल रजिस्टर तपासले आणि कर्मचाऱ्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला. शाहूनगर परिसरातील पाण्याचे कनेक्शन आणि नळांच्या तोट्यांमधील बिघाड तातडीने दुरुस्त करावेत, तसेच गळतीमुळे पाणी वाया जाणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले. उर्दू शाळा क्रमांक १२ परिसराच्या पाहणीदरम्यान शाळेची संरक्षण भिंत तुटलेली असल्याचे आणि परिसरात काही नागरिक भंगार गोळा करत असल्याचे आढळले. शाळेच्या आवारातील मोठा भाग वापराविना पडून असल्याचेही निदर्शनास आले. शाळेच्या मालमत्तेची सुरक्षितता आणि परिसराच्या देखभालीबाबत प्रश्न उपस्थित करत महापौरांनी शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकाऱ्यांना जाब विचारला. या प्रकरणी संबंधितांकडून तातडीने लेखी स्पष्टीकरण मागविण्याचे निर्देश देण्यात आले.

शाहूनगर मार्केटमधील स्वच्छतेच्या प्रश्नावरही महापौरांनी लक्ष केंद्रित केले. दुकानदारांनी दुकानांसमोर कचरापेटी ठेवणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट करत परिसर स्वच्छ ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. दुकानांसमोर किंवा सार्वजनिक जागांवर कचरा साचणार नाही, याची जबाबदारी संबंधितांनी घ्यावी, असेही सांगण्यात आले. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. पाहणीदरम्यान रस्त्यावर धूळ खात पडलेल्या बंद रिक्षांचा प्रश्नही समोर आला. अशा वाहनांमुळे सार्वजनिक जागेचा वापर अडथळलेला असल्याने संबंधित रिक्षा हटविण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश महापौरांनी दिले. तसेच बॉम्बे बिर्याणीसह इतर ठिकाणी असल्याचे निदर्शनास आलेले कथित बेकायदेशीर अतिक्रमण हटविण्याचे आदेश अतिक्रमण विभागाला देण्यात आले. आवश्यक नियमानुसार कार्यवाही करून संबंधित भंगार साहित्य जप्त करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

परिसरातील गटारी मोकळ्या करून पाण्याचा निचरा सुरळीत करावा, तसेच स्वच्छतेच्या कामात दिरंगाई होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. स्वच्छता, पाणीपुरवठा आणि अतिक्रमण या तिन्ही बाबींमध्ये समन्वयाने काम करून नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या तातडीने सोडविण्याची गरज या पाहणीतून अधोरेखित झाली. या पाहणीवेळी स्थानिक नगरसेवक दीपक सूर्यवंशी, ॲड. शुचिता हाडा, अर्शीनबानो खाटीक, शहर अभियंता आर. टी. पाटील, आरोग्य विभागाचे प्रमुख समीर बोरोले तसेच आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. महापौरांनी दिलेल्या निर्देशांनुसार संबंधित विभागांकडून किती वेगाने कार्यवाही होते आणि परिसरातील समस्या प्रत्यक्षात कितपत दूर होतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound