जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सवैव वादाच्या भोवऱ्यात असलेल्या सार्वजनीक बांधकाम खात्याच्या उत्तर विभागात आज ठेकेदार हक्काची सिक्युरिटी डिपॉजीट घेण्यासाठी आला असतांना एका कर्मचाऱ्याने थेट त्याच्यावर खुर्ची उगारल्याची धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी होत आहे.
सार्वजनीक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता महेश पाटील यांच्या सुस्त आणि भोंगळ कारभारामुळे सर्वच जण त्रस्त झालेले आहेत. दिवाळीच्या आधीच राज्य शासनाकडून कंत्राटदारांना देण्यासाठी मोठी रक्कम आली असली तरी याच्या वाटपाचे योग्य नियोजन न झाल्यामुळे अद्यापही बिलांची रक्कम अदा करण्यात आली नसल्याने ठेकेदारांची दिवाळी अंधारात गेली आहे. यातच आज दुपारी येथील कार्यालयात एक धक्कादायक बाब घडली.

सार्वजनीक बांधकाम खात्यात काम पूर्ण केलेल्या ठेकेदाराने खात्याकडे जमा असलेली तीन टक्के रक्कम ही नियमानुसार आपल्याला मिळावी अशी मागणी केली. वास्तविक पाहता, संबंधीत काम पूर्ण झाले असून तालुका पातळीवरून अधिकाऱ्यांकडून ही रक्कम मिळावी अशी शिफारस देखील आलेली आहे. असे असतांना देखील या ठेकेदाराला संबंधीत रक्कम देण्यास टाळाटाळ करण्यात आली. यात शाब्दीक वाद झाल्याने वातावरण चिघळले. यातच एक कर्मचारी खुर्ची घेऊन त्या ठेकेदाराला मारण्यासाठी पुढे आल्याने उपस्थितांना धक्का बसला. यातून येथे बराच काळ मोठ्या गोंधळाचे वातावरण निर्मित झाले.
सा. बां. खात्याच्या उत्तर विभागाच्या कार्यकारी अभियंतापदाची खुर्ची ही जणू काही शापीतच मानली जाते. येथे कार्यरत असणाऱ्या आधीच्या अधिकाऱ्यांवर अनेकदा कार्यवाही झालेली आहे. यातच महेश पाटील यांच्या भोंगळ कारभारामुळे समस्त अधिकारी, कर्मचारी आणि ठेकेदार त्रस्त झालेले आहेत. यातच आता ज्याचे खात्याकडे नियमानुसार पैसे बाकी आहेत, त्या ठेकेदारालाच खुर्ची उगारून मारण्याचा प्रयत्न होत असल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
सदर घटनेबाबत प्रस्तुत प्रतिनिधीने अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. ते सध्या सुटीवर असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी होऊन दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता होत आहे.



