Home प्रशासन आठवडाभरात पीकविम्याची रक्कम खात्यात जमा करा, अन्यथा २५ रोजी रास्ता रोको !

आठवडाभरात पीकविम्याची रक्कम खात्यात जमा करा, अन्यथा २५ रोजी रास्ता रोको !

0
6

रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । केळी पीकविम्याची रखडलेली रक्कम आणि विमा पोर्टलवरून वगळलेले क्षेत्र पूर्ववत न केल्यामुळे रावेर तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. येत्या आठवडाभरात पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करून वगळलेले क्षेत्र पूर्ववत करावे, अन्यथा २५ नोव्हेंबर रोजी रावेर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे. यासंदर्भात सोमवारी (दि. १६) शेतकऱ्यांनी तहसीलदार संजय तायडे यांना निवेदन दिले.

गेल्या तीन महिन्यांपासून जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी पीकविम्याच्या प्रतीक्षेत आहेत. आधीच वादळामुळे केळी पिकाचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अशा परिस्थितीत पीकविम्याची रक्कम मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यातच विमा कंपनीकडून वेगवेगळी आश्वासने दिली जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. ६ नोव्हेंबर रोजी जळगाव येथे केळी उत्पादक शेतकऱ्यांनी पीकविम्याच्या मागणीसाठी आंदोलन केले होते. त्यावेळी विभागीय अधिकारी सोमेश देशमुख यांनी २० नोव्हेंबरपर्यंत विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच विमा पोर्टलवरून कमी करण्यात आलेले आणि वगळलेले क्षेत्र पूर्ववत करून त्यानुसार पीकविम्याची रक्कम देण्याचा शब्दही त्यांनी दिला होता.

मात्र, १४ नोव्हेंबर रोजी पोर्टलवर तपासणी केली असता आधीप्रमाणेच कमी केलेले आणि वगळलेले क्षेत्र कायम असल्याचे शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले. दिलेल्या आश्वासनानंतरही कोणताही बदल न झाल्याने शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला आहे. त्यामुळे आता केवळ आश्वासन नको, तर प्रत्यक्ष खात्यात पैसे जमा झाले पाहिजेत, अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. सोमवारी रावेर तहसील कार्यालयात मोठ्या संख्येने शेतकरी एकत्र आले. त्यांनी तहसीलदार संजय तायडे यांची भेट घेऊन पीकविम्याच्या प्रश्नावर तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी या प्रकरणात थेट लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली.

यावेळी शेतकऱ्यांनी हे शेवटचे निवेदन असल्याचे स्पष्ट केले. आठवडाभरात विम्याची रक्कम खात्यात जमा झाली नाही आणि वगळलेले क्षेत्र पूर्ववत करण्यात आले नाही, तर २५ नोव्हेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. पीकविम्याची रक्कम जमा झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असा आक्रमक इशाराही देण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने तहसील कार्यालयाचा परिसर दणाणून गेला. दरम्यान, तहसीलदार संजय तायडे यांनी पीकविमा कंपनीचे मुंबई येथील प्रतिनिधी श्री. झनकर आणि नाशिक विभागाचे प्रमुख सोमेश देशमुख यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघांकडूनही प्रतिसाद मिळाला नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. संबंधित अधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देऊन समज द्यावी, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली.

शेतकऱ्यांचा वाढता रोष लक्षात घेऊन तहसीलदार संजय तायडे यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाला कळवली. तसेच विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनाही तातडीने प्रश्न सोडविण्याबाबत सूचना दिल्या. दरम्यान, जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातही संकेत पाटील यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी पीकविम्याच्या प्रश्नावर निवेदन सादर केले. या आंदोलनप्रसंगी शेतकरी सुनील कोंडे यांच्यासह रावेर बाजार समितीचे माजी सभापती सचिन पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वाय. एस. महाजन, रामदास लहासे, दिलीप पाटील, विकास महाजन, मधुकर पाटील, संजय पवार, अशोक भिरुड, गोपाळ बऱ्हाटे, चेतन सांगळे, रत्नाकर महाजन, योगेश पाटील, पंकज पाटील, रवींद्र चौधरी, मोहन बोंडे, डिगंबर नेहेते, सोपान पाटील, शुभम पाटील यांच्यासह असंख्य शेतकरी उपस्थित होते.


Protected Content

Play sound