जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । संगम सोसायटी येथील महापालिकेचा खुला भूखंड पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. प्रशासनाने दिलेल्या अटी-शर्तींचा सरेआम भंग करून, या भूखंडावर पुन्हा एकदा अनधिकृत बांधकाम सुरू करण्यात आल्याचा आरोप येथील स्थानिक नागरीकांनी केला आहे. या प्रकारामुळे स्थानिक रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली असून, महापालिकेने यावर तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.
महापालिकेच्या मालकीचा हा भूखंड ‘गुजराथी मित्र मंडळा’ला ३० वर्षांच्या करारावर भाडेतत्त्वावर देण्यात आला होता. या करारात मंडळाला काही स्पष्ट अटी आणि शर्तींचे पालन करणे बंधनकारक होते. मात्र, मंडळाने नियमांचे उल्लंघन केल्याची बाब समोर आल्यावर, सामाजिक कार्यकर्ते सचिन पाटील यांनी महापालिकेकडे लेखी तक्रार केली होती. त्या तक्रारीची दखल घेत, त्यावेळी महापालिका प्रशासनाने धडक कारवाई करत जेसीबीच्या साहाय्याने केलेले अतिरिक्त बांधकाम जमीनदोस्त केले होते.

मात्र, प्रशासनाची ही कारवाई केवळ तात्पुरती ठरली की काय, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. कारण, काही महिन्याच्या शांततेनंतर संबंधित मंडळाने पुन्हा एकदा लपून-छपून बांधकाम सुरू केले आहे. प्रशासनाच्या डोळ्यात धूळ झोकून सुरू असलेल्या या प्रकारामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत.
“आम्ही वारंवार तक्रार करूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई का केली जात नाही?” असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते सचिन पाटील यांनी उपस्थित केला आहे. आता महापालिका प्रशासन या प्रकाराची गांभीर्याने दखल घेणार का, की केवळ कागदी घोडे नाचवले जाणार, याकडे जळगावकर नागरिकांचे लक्ष लागले आहे.



