जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । दीर्घकाळापासून पोटदुखी आणि अनियमित रक्तस्त्रावाच्या त्रासाने त्रस्त असलेल्या ३७ वर्षीय महिलेच्या पोटातून सुमारे दीड किलो वजनाची गाठ यशस्वीरीत्या काढण्यात जळगावातील डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाला यश आले आहे. या शस्त्रक्रियेमुळे संबंधित महिलेला मोठा दिलासा मिळाला असून सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यातील अनिता भिल या ३७ वर्षीय महिलेला गेल्या काही महिन्यांपासून पोटदुखीचा त्रास होत होता. सुरुवातीला साधारण वाटणारा हा त्रास कालांतराने वाढत गेला. त्यासोबतच अनियमित रक्तस्त्रावाची समस्या निर्माण झाली. त्रास असह्य झाल्यानंतर त्यांनी जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात उपचारासाठी धाव घेतली. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर स्त्रीरोग विभागाच्या प्रमुख डॉ. माया आर्विकर यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने रुग्णाची सखोल तपासणी केली.

डॉ. वैभव पाटील, डॉ. मृदुला मुंगसे, डॉ. रश्मी संघवी, डॉ. ऐश्वर्या आणि डॉ. प्राजक्ता यांच्या पथकाने सोनोग्राफीसह विविध आवश्यक वैद्यकीय तपासण्या केल्या. या तपासण्यांमध्ये महिलेच्या गर्भाशयात मल्टीपल फायब्रॉइड असल्याचे निदान झाले. फायब्रॉइड म्हणजे गर्भाशयात तयार होणाऱ्या गाठी असून त्या मोठ्या प्रमाणात वाढल्यास गंभीर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. गाठींचा आकार मोठा असल्यामुळे औषधोपचाराने फायदा होण्याची शक्यता कमी असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
रुग्णाच्या कुटुंबीयांची संमती घेतल्यानंतर तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. स्त्रीरोग विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांनी हिस्टेक्टोमी ही शस्त्रक्रिया अत्यंत काळजीपूर्वक पार पाडली. शस्त्रक्रियेदरम्यान गर्भाशयात तयार झालेल्या अनेक गाठी काढण्यात आल्या. विशेष म्हणजे या सर्व गाठींचे एकत्रित वजन सुमारे दीड किलो इतके होते. कोणतीही गुंतागुंत न होता ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाली.
शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती लक्षणीयरीत्या सुधारली असून ती सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली स्थिर आहे. रुग्णालयातील आधुनिक वैद्यकीय सुविधा आणि अनुभवी डॉक्टरांच्या समन्वयामुळे ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया शक्य झाली, असेही रुग्णालय प्रशासनाने सांगितले.
दरम्यान, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. रश्मी संघवी यांनी सांगितले की, गर्भाशयातील फायब्रॉइड हा महिलांमध्ये आढळणारा सामान्य आजार असला तरी दुर्लक्ष केल्यास तो गंभीर ठरू शकतो. पोटदुखी, जास्त रक्तस्त्राव, मासिक पाळीतील अनियमितता किंवा पोटात गाठ जाणवणे ही लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. वेळेवर निदान आणि उपचार केल्यास मोठ्या गुंतागुंती टाळता येऊ शकतात.



