


जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जळगाव शहर महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागातर्फे शहर पाणीपुरवठा योजनेअंतर्गत वाघूर जलशुद्धीकरण केंद्र येथील ३३ केव्ही उच्चदाब वीज वाहिनीची दुरुस्ती व देखभाल तसेच महावितरण कंपनीतर्फे सबस्टेशन दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. यामुळे शनिवार, दि. १२ सप्टेंबर २०२६ रोजी शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.
महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिलेल्या जाहीर सूचनेनुसार, शनिवार दि. १२ सप्टेंबर २०२६ रोजी दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर पुढील दिवशी म्हणजे रविवार, दि. १३ सप्टेंबर २०२६ रोजी शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत सुरू केला जाईल. मात्र, वीज वाहिनी व सबस्टेशनच्या या तांत्रिक दुरुस्तीमुळे संपूर्ण जळगाव शहरातील नियोजित भागांचा पाणीपुरवठा एक दिवस उशिराने (विलंबाने) होणार आहे.
महापालिका पाणी पुरवठा विभागाच्या उपअभियंत्यांनी शहरातील नागरिकांना या बदलाची नोंद घेण्याचे आवाहन केले आहे. १२ सप्टेंबर रोजी पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा साठा जपून व काटकसरीने वापरावा, तसेच मनपा प्रशासनास सहकार्य करावे, अशी विनंती जाहीर सूचनेद्वारे करण्यात आली आहे.
जळगाव महापालिकेच्या या दुरुस्ती कामामुळे शनिवारी पाणी बंद राहून पुढील नियमित वेळापत्रकातील पाणीपुरवठा एक दिवस उशिराने मिळणार असल्याने जळगावकरांना पाण्याचा योग्य नियोजनपूर्वक वापर करावा लागणार आहे.



