Home Cities मुक्ताईनगर मुक्ताईनगर एमआयडीसीसाठी प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात! आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांकडून १३०...

मुक्ताईनगर एमआयडीसीसाठी प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात! आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांकडून १३० हेक्टर जागेची पाहणी

0
69

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यात बहुप्रतिक्षित असलेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) स्थापनेच्या दृष्टीने शुक्रवारी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक हालचालींना सुरुवात झाली आहे. आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत एमआयडीसी, महसूल आणि भूमिअभिलेख विभागाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकाने प्रस्तावित जागेची प्रत्यक्ष पाहणी करून मोजणी आणि प्रस्ताव तयार करण्याच्या प्रक्रियेचा नारळ फोडला. या पाहणीमुळे तालुक्यातील औद्योगिक विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.

मुक्ताईनगरात एमआयडीसी उभारण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात होता. या पार्श्वभूमीवर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या विशेष बैठकीत एमआयडीसीसाठी योग्य जागेची पाहणी करून तातडीने जागा निश्चित करण्याचे स्पष्ट आदेश संबंधित यंत्रणांना देण्यात आले होते. त्या निर्णयानुसार शुक्रवारी एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी, महसूल व भूमिअभिलेख विभागाचे पथक मुक्ताईनगरात दाखल झाले. या वेळी शासकीय जमिनीची मोजणी करणे, नकाशा तयार करणे आणि पुढील अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे पाठवायचा मुख्य प्रस्ताव तयार करण्याच्या प्राथमिक कामकाजाला गती देण्यात आली.

प्रस्तावित शासकीय जमिनीवर जलसंपदा विभागाच्या लाभक्षेत्राचे शिक्के असल्याने जमीन एमआयडीसीकडे हस्तांतरित करण्यात काही प्रशासकीय अडचणी निर्माण होत होत्या. मात्र, यावर तोडगा काढण्यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत विशेष बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत सकारात्मक चर्चा करून लाभक्षेत्राचे हे शिक्के कमी करून संबंधित जमीन एमआयडीसीच्या नावावर उपलब्ध करून देण्याचा मार्ग मोकळा करण्यात आल्याचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

या वेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, तालुक्यातील रोजगाराचा प्रश्न सोडवण्यासाठी एमआयडीसी लवकरात लवकर सुरू करण्याचा आमचा ठाम मानस आहे. यासाठी सुमारे २५० एकर क्षेत्राचा प्राथमिक विचार असून एकूण १३० हेक्टर शासकीय जमीन अधिग्रहित करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मुक्ताईनगर तालुक्याला भौगोलिकदृष्ट्या अत्यंत अनुकूल स्थान लाभले आहे. तालुक्यातून राष्ट्रीय महामार्ग आणि लोहमार्ग गेले असून, मध्यप्रदेश राज्याची सीमा अवघ्या काही अंतरावर आहे. तसेच इंदूर-हैदराबाद (७५३) हा अत्यंत महत्त्वाचा मार्गही विकसित होत असल्याने येथे मोठे उद्योग आकर्षित होतील आणि स्थानिक तरुणांना रोजगाराच्या उदंड संधी उपलब्ध मिळून परिसराचा आर्थिक कायापालट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या संयुक्त पाहणीप्रसंगी आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह एमआयडीसी जळगावच्या प्रादेशिक अधिकारी दीपाली कासवे, मुक्ताईनगरचे निवासी नायब तहसीलदार निकेतन वाळे, मंडळ अधिकारी ढवळे, तायडे, संबंधित क्षेत्राचे तलाठी तसेच भूमिअभिलेख व एमआयडीसी विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते. सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जागेची बारकाईने पाहणी करून एमआयडीसीच्या हस्तांतरणासाठी आवश्यक असणाऱ्या कायदेशीर कागदपत्रांची तयारी तात्काळ सुरू केली आहे.


Protected Content

Play sound