वरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । धुळे येथील क्रीडा संकुलात पार पडलेल्या १९ व्या महाराष्ट्र राज्यस्तरीय अधिकृत ग्रॅपलिंग (मल्लयुद्ध) चॅम्पियनशिप २०२६ च्या जिल्हास्तरीय निवड स्पर्धेत वरणगाव येथील श्री हनुमान व्यायाम शाळेच्या खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले आहे. हनुमान व्यायाम शाळा व जिल्हा ग्रॅपलिंग असोसिएशनच्या या मल्लांनी विविध वजनी गटांत सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदकांची लूट करत वरणगाव शहराचा डंका वाजवला असून, त्यांची आता हरिद्वार येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या स्पर्धेमध्ये १३ वर्षांखालील ४२ किलो वजनी गटात ओम भरत माळी याने ‘नो-गी’ (No-Gi) प्रकारात सुवर्णपदक (Gold Medal) आणि मल्लयुद्ध प्रकारात कांस्यपदक पटकावले. १५ वर्षांखालील ४७ किलो गटात नामेश्वर भरत माळी याने ‘नो-गी’ प्रकारात रौप्यपदक व मल्लयुद्ध प्रकारात कांस्यपदक मिळवले. ७३ किलो वजनी गटात सुनील शिवाजी कचरे याने ‘नो-गी’ प्रकारात कांस्यपदक तर मल्लयुद्ध प्रकारात चमकदार कामगिरी करत सुवर्णपदकावर नाव कोरले. याशिवाय १०० किलो वजनी गटात ओम गणेश महाजन याने ‘नो-गी’ प्रकारात सुवर्णपदक आणि मल्लयुद्ध प्रकारात रौप्यपदक पटकावले. तसेच सीनियर वरिष्ठ ६६ किलो वजनी गटात प्रणय बावस्कर याने उत्कृष्ट पकड दाखवत ‘नो-गी’ प्रकारात सुवर्णपदक आपल्या नावे केले.

जिल्हास्तरीय स्पर्धेत बाजी मारणाऱ्या या सर्व यशस्वी मल्लांचे राज्य ग्रॅपलिंग संस्थेच्या अध्यक्षा अर्चना देशमुख व राज्य सचिव संतोष देशमुख यांनी पदके (Medals) देऊन विशेष कौतुक केले. धुळ्यातील या यशानंतर सर्व विजेते खेळाडू येत्या २४ ते २६ ऑक्टोबर दरम्यान हरिद्वार (उत्तराखंड) येथे होणाऱ्या राज्यस्तरीय चॅम्पियनशिप स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी रवाना होणार आहेत, अशी माहिती जिल्हाध्यक्ष पैलवान संजय बावस्कर, उपाध्यक्ष पैलवान उत्तम भोई, सचिव पैलवान दिलीप संगेले आणि सहसचिव बाळासाहेब चव्हाण यांनी दिली आहे.
या दैदिप्यमान यशाबद्दल श्री हनुमान व्यायाम शाळेतर्फे सर्व विजयी खेळाडूंचा विशेष नागरी सत्कार करण्यात आला. या प्रसंगी व्यायाम शाळेचे अध्यक्ष सुनील काळे, उपाध्यक्ष नामदेव पैलवान, संजय बावस्कर, विनोद झोपे, एकनाथ पैलवान, चुडामण वाघ, विनोद पटेल, संजय चौधरी, दिनेश देशमुख, इच्छाराम पैलवान, दिलीप पैलवान, रमेश पैलवान, उत्तम पैलवान यांच्यासह अनेक मान्यवर व पैलवान उपस्थित होते.



