जामनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जामनेर येथे सकल मराठा समाजाची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहपूर्ण आणि संघटनात्मक वातावरणात पार पडली असून आगामी राज्यव्यापी उपक्रमांच्या पार्श्वभूमीवर समाजबांधवांना एकत्र आणण्याचा ठाम निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या समाजबांधवांनी एकोप्याचा संदेश देत आगामी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सज्ज असल्याचे दर्शविले.
या बैठकीत राजमाता जिजाऊ यांच्या माहेरचे वंशज शिवाजी राजे जाधव यांनी मार्गदर्शन करताना जिजाऊंच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा पुढे नेण्याची गरज अधोरेखित केली. सिंदखेडराजा येथील जन्मस्थळापासून पाचाड (रायगड) येथील स्मृतीस्थळापर्यंत आयोजित करण्यात येणाऱ्या जिजाऊ अभिवादन यात्रेत जामनेर तालुक्यातून मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे त्यांनी आवाहन केले. ही यात्रा केवळ श्रद्धेची नसून मराठा समाजाच्या एकतेचा आणि विचारप्रसाराचा प्रभावी मंच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी अशोक शिंदे यांनी आपल्या भाषणात मराठा समाजाने आपल्या गौरवशाली इतिहासाची जाणीव कायम ठेवण्यावर भर दिला. राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांवर आधारित संघटनात्मक कार्य उभारणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. छत्रपती शिवाजी ब्रिगेड अन्यायाविरुद्ध ठाम भूमिका घेत असून समाजाच्या विविध प्रश्नांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवत असल्याचे सांगत समाजातील एकोपा अधिक मजबूत करण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष भाग्योदय कलेक्शनचे प्रकाश पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात मराठा समाजातील तरुणांनी उद्योग-व्यवसाय क्षेत्रात पुढाकार घ्यावा, असे सांगितले. छोटा असो वा मोठा व्यवसाय, स्वतःच्या पायावर उभे राहणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. समाजातील प्रत्येक उद्योजक तरुणाच्या पाठीशी संपूर्ण मराठा समाज ठामपणे उभा आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल चव्हाण यांनी केले. त्यांनी १४ जून ते १७ जून दरम्यान होणाऱ्या जिजाऊ अभिवादन यात्रेच्या पार्श्वभूमीवर ग्रामपातळीवर बैठका घेऊन व्यापक जनजागृती करण्याची गरज व्यक्त केली. मागील तीन वर्षांपासून यात्रेत सहभाग नोंदवला जात असला तरी यंदा विक्रमी सहभाग नोंदवण्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखवला.
या बैठकीस अशोक आप्पा जाधव, समाधान वाघ, सुपडू पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच दिलीप खोडपे सर, व्ही.पी. पाटील सर, पप्पू पाटील, कैलास पाटील, ईश्वर पवार, अशोक पाटील, दिलीप पाटील, ईश्वर चवरे, रवि बंडे, सागर पाटील, दिपक पाटील, राहुलरॉय मुळे, सागर मराठे यांच्यासह असंख्य समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल ठोंबरे यांनी केले. या बैठकीतून मराठा समाजाच्या संघटनात्मक बळकटीसाठी ठोस दिशा देण्यात आली असून आगामी जिजाऊ अभिवादन यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात जनसहभाग घडवून आणण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. एकोप्याच्या बळावर समाजाच्या प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज उठवण्याचा संदेश या बैठकीतून देण्यात आला.



