Home Cities जळगाव धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थी व कर्तृत्ववानांचा १६ ऑगस्टला गौरव

धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थी व कर्तृत्ववानांचा १६ ऑगस्टला गौरव

0
39

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त जळगाव जिल्हा धनगर समाज महासंघ, मल्हार सेना, कर्मचारी संघटना, अहिल्या महिला संघ आणि सांस्कृतिक महासंघ, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान समाजबांधवांचा भव्य गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. रविवार, दि. १६ ऑगस्ट रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक, निमखेडी रोड, जळगाव येथे हा कार्यक्रम होणार असून, पात्र विद्यार्थ्यांनी आपली गुणपत्रिका व आवश्यक कागदपत्रे लवकरात लवकर जमा करावीत, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

या गौरव सोहळ्यात इयत्ता दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर तसेच इतर शैक्षणिक परीक्षांमध्ये ६० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. त्याचबरोबर एमपीएससी, यूपीएससी तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविणारे विद्यार्थी, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय प्राविण्य मिळविणारे तसेच विविध क्षेत्रांत विशेष कामगिरी करणाऱ्या समाजबांधवांचाही गौरव केला जाणार आहे.

समाजातील गुणवंत आणि कर्तृत्ववान व्यक्तींच्या यशाची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन देणे, त्यांच्या कामगिरीचा सन्मान करणे आणि नव्या पिढीसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. शिक्षण, स्पर्धा परीक्षा, क्रीडा तसेच इतर क्षेत्रांमध्ये समाजातील युवक-युवतींनी अधिकाधिक प्रगती करावी, यासाठी अशा उपक्रमांचा सकारात्मक प्रभाव पडतो. गौरवासाठी पात्र विद्यार्थ्यांनी आपल्या गुणपत्रिकेची झेरॉक्स प्रत तसेच आवश्यक कागदपत्रे मल्हार सेना कार्यालय, हॉटेल रामनिवास, स्टेशन रोड, जळगाव येथे जमा करावीत. तसेच आपल्या परिसरातील मल्हार सेना पदाधिकाऱ्यांकडेही कागदपत्रे जमा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांनी अंतिम वेळेची प्रतीक्षा न करता आपली कागदपत्रे लवकर सादर करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

या उपक्रमातून गुणवंत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाला सार्वजनिक व्यासपीठ मिळणार असून, क्रीडा, स्पर्धा परीक्षा आणि सामाजिक तसेच विविध व्यावसायिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानालाही मान्यता मिळणार आहे. त्यामुळे समाजातील पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा आणि पात्र विद्यार्थ्यांची नावे व कागदपत्रे वेळेत आयोजकांकडे पोहोचवावीत, असेही आयोजकांनी स्पष्ट केले आहे. या गौरव सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी जळगाव जिल्हा धनगर समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष गणेश बागुल, सुभाष सोनवणे, प्रभाकर न्हाळदे, सुभाष करे, अरुण ठाकरे, संदीप तेले, दिलीप धनगर, प्रमिला कंखरे, तुळशीराम सोनवणे, महेंद्र सोनवणे, प्रवीण पवार, यशवंत शिरोळे, संतोष कचरे आणि दीपक धनगर यांनी समाजबांधवांना सहकार्याचे आवाहन केले आहे.


Protected Content

Play sound