Home Cities यावल जे. टी. महाजन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात

जे. टी. महाजन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात

0
9

फैजपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जे. टी. महाजन इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, फैजपूर येथे गुरुपौर्णिमा भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये गुरूंबद्दल आदर, कृतज्ञता आणि संस्कारांची भावना रुजविण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमात विविध सांस्कृतिक आणि प्रेरणादायी उपक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाला एच.आर.डी. इन्स्टिट्यूटचे ट्रेनर एजाज शेख यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली, तर शाळेचे प्राचार्य मोझेस जाधव अध्यक्षस्थानी होते.

कार्यक्रमाची सुरुवात महर्षी व्यास यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर इयत्ता दहावीची विद्यार्थिनी सुप्रिया मेढे हिने गुरुपौर्णिमेचे महत्त्व विशद करणारे प्रेरणादायी मनोगत व्यक्त केले. गुरू हे केवळ शिक्षण देणारे नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणारे आणि जीवनाला योग्य दिशा देणारे मार्गदर्शक असतात, हा संदेश तिच्या मनोगतातून देण्यात आला. शाळेचे प्राचार्य मोझेस जाधव यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून विद्यार्थ्यांनी गुरूंचा आदर, शिस्त, प्रामाणिकपणा आणि ज्ञानार्जनाची जिद्द या मूल्यांचा अंगीकार करावा, असे आवाहन केले. गुरूंच्या शिकवणीचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोग करून जबाबदार आणि आदर्श नागरिक घडण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी करावा, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला.

यानंतर इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी पूर्वा चोपडे हिने गुरूंच्या महिम्याचे वर्णन करणारी हृदयस्पर्शी कविता सादर केली. तिच्या प्रभावी सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देतानाच गुरूंबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याचा सुंदर प्रयत्न या कवितेतून करण्यात आला. कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरले ते इयत्ता आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले ‘गुरू-शिष्य परंपरा’ हे नाट्यप्रयोग. गुरूंचे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील स्थान, संस्कारांचे महत्त्व आणि ज्ञानपरंपरेची भूमिका यांचे प्रभावी चित्रण या नाट्यप्रयोगातून करण्यात आले. गुरूंच्या मार्गदर्शनामुळे व्यक्तीच्या जीवनाची दशा आणि दिशा बदलू शकते, हा विचार विद्यार्थ्यांनी अभिनयातून प्रभावीपणे मांडला. कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी पर्यवेक्षिका पूनम नेहेते यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच नाट्यप्रयोगाच्या सादरीकरणासाठी शिक्षिका पायल खंडाले, वैशाली किरंगे आणि दिपाली पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाला शाळेतील शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीची विद्यार्थिनी धनश्री वाघमारे हिने केले. तर समीक्षा मेढे हिने उपस्थितांचे आभार मानले.


Protected Content

Play sound