धरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पर्यावरण संवर्धन आणि वृक्षलागवडीबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने धरणगावातील बालकवी ठोंबरे व सारजाई कुडे विद्यालयात वनविभागाच्या वतीने विविध वृक्षांची रोपे वाटप करण्यात आली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी केवळ वृक्षारोपण न करता लावलेल्या झाडांचे संगोपन आणि संवर्धन करण्याचा संदेश देण्यात आला.
यावेळी तालुका वनाधिकारी भाग्यश्री सांगले तसेच वनविभागातील त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्यालयाला विविध प्रकारची रोपे भेट दिली. कार्यक्रमाला विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. बी. पाटील, पर्यवेक्षक डी. आर. चव्हाण, हरित सेनेचे प्रमुख शिक्षक किशोर चौधरी, वनविभागाचे अधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना वृक्षांचे पर्यावरणातील महत्त्व, वाढते प्रदूषण, निसर्गाचा समतोल आणि वृक्षसंवर्धनाची गरज याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्याने किमान एक झाड लावून त्याची नियमित काळजी घ्यावी, त्याला वेळोवेळी पाणी द्यावे आणि ते मोठे होईपर्यंत त्याचे संरक्षण करावे, असे आवाहन करण्यात आले. वनविभागाकडून मिळालेल्या रोपांचा विद्यालय परिसरात योग्य ठिकाणी उपयोग करून अधिकाधिक वृक्षलागवड करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. विद्यार्थ्यांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत रोपांची जपणूक करण्याचा संकल्प केला. वृक्षांचे संगोपन ही पर्यावरण रक्षणाची पहिली पायरी असून, अशा उपक्रमांतून विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाविषयी आपुलकी आणि जबाबदारीची भावना निर्माण होत असल्याचे उपस्थितांनी नमूद केले. विद्यालयाच्या वतीने वनविभागाचे आभार मानण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा आणि त्यातून भविष्यात पर्यावरणपूरक नागरिक घडावेत, या उद्देशाने अशा उपक्रमांना सातत्य देण्याची गरजही यावेळी व्यक्त करण्यात आली.




