Home Uncategorized पाय घसरून विहिरीत पडल्याने तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

पाय घसरून विहिरीत पडल्याने तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

0
1

अमळनेर | लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील कळमसरे येथे शेतात औषध फवारणीसाठी पाणी भरत असताना पाय घसरून विहिरीत पडल्याने ३१ वर्षीय तरुण शेतकरी दीपक दत्तूसिंग राजपूत यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली असून, कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दीपक दत्तूसिंग राजपूत (वय ३१) हे मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास स्वतःच्या शेतात औषध फवारणीसाठी जात होते. बैलगाडीसह शेताकडे जात असताना गावाबाहेरील गणपती मंदिराजवळील विहिरीवर ते फवारणी पंपात पाणी भरण्यासाठी थांबले. चार ते पाच बादल्या पाणी काढल्यानंतर शेवटची बादली काढत असताना त्यांचा अचानक तोल गेला आणि पाय घसरल्याने ते विहिरीत कोसळले.

घटनेची माहिती मंदिराजवळील किशोर हरी मालचे यांना मिळताच त्यांनी तातडीने गावातील नातेवाईकांना याबाबत कळविले. ग्रामस्थांच्या मदतीने दीपक यांना विहिरीतून बाहेर काढून तात्काळ अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील व सरपंच यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर मारवड पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला असून, संध्याकाळी त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

दीपक राजपूत यांच्या पश्चात आई, एक भाऊ आणि दोन बहिणी असा परिवार आहे. घरातील कर्ता मुलगा अकाली गेल्याने कुटुंबीयांवर मोठा आघात झाला असून, संपूर्ण कळमसरे गावात हळहळ व्यक्त होत आहे. मारवड पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक साजित मन्सूरी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संजय पाटील पुढील तपास करीत आहेत.


Protected Content

Play sound