मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील हरताळा शिवारातील वन विभागाचा बंद करण्यात आलेला सातोड ते चक्रधर स्वामी मंदिराकडे जाणारा रस्ता तातडीने खुला करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. हा रस्ता खुला न केल्यास 15 ऑगस्ट 2026 पासून तहसील कार्यालय, मुक्ताईनगर येथे बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा माजी विशेष कार्यकारी अधिकारी व माजी अध्यक्ष अतुल अरुण जावरे यांनी दिला आहे.
यासंदर्भात हरताळा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांना निवेदन देण्यात आले असून, या रस्त्यामुळे अनेक वर्षांपासून नागरिकांची ये-जा सुरू होती. मात्र, वन विभागाकडून हा मार्ग बंद करण्यात आल्याने परिसरातील नागरिक, शेतकरी, वारकरी, श्रीकृष्ण भक्त तसेच चक्रधर स्वामी मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. हरताळा तलाव परिसराला पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्यासाठी वन विभागाने सुमारे 4 ते 5 कोटी रुपये खर्च करून उद्यान (पार्क) तयार केले आहे. मात्र, या परिसराकडे जाणारा प्रमुख मार्गच बंद असल्यामुळे नागरिकांना तलाव, उद्यान आणि मंदिर परिसरात पोहोचण्यासाठी गैरसोय होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या रस्त्याच्या प्रश्नावर यापूर्वी तहसील कार्यालय तसेच वन विभागाकडे पाठपुरावा करण्यात आला होता. 27 जानेवारी 2026 आणि 13 जुलै 2026 रोजी संबंधित विभागांना पत्रव्यवहार करण्यात आला असून, तहसीलदारांनी 14 जुलै 2026 रोजी वन विभागाला रस्ता खुला करण्याबाबत पत्र पाठविल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मात्र, अद्याप या प्रकरणी कोणताही ठोस निर्णय झालेला नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. रस्ता खुला करण्याच्या मागणीसाठी आता आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात येणार असल्याचे अतुल अरुण जावरे यांनी स्पष्ट केले आहे. 15 ऑगस्ट 2026 रोजी मुक्ताईनगर तहसील कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेसमोर बेमुदत उपोषण करण्यात येणार असून, हरताळा, निमखेडी तसेच मुक्ताईनगर तालुक्यातील नागरिकांनी या जनहिताच्या आंदोलनात सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.



