Home Cities यावल प्रथम वर्ष विद्यार्थ्यांसाठी करिअरची नवी दिशा; जे. टी. महाजन पॉलिटेक्निकचा इंडक्शन सोहळा...

प्रथम वर्ष विद्यार्थ्यांसाठी करिअरची नवी दिशा; जे. टी. महाजन पॉलिटेक्निकचा इंडक्शन सोहळा उत्साहात

0
6

फैजपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शैक्षणिक वर्ष २०२६–२७ मध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयीन जीवन अधिक आत्मविश्वासपूर्ण आणि दिशादर्शक व्हावे, या उद्देशाने जे. टी. महाजन पॉलिटेक्निक, फैजपूर येथे प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी इंडक्शन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शिक्षण, शिस्त, सायबर सुरक्षितता, शिष्यवृत्ती आणि प्लेसमेंटसंदर्भात सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात जे. टी. महाजन अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. जी. पाटील, तंत्रनिकेतनाचे प्राचार्य पी. एम. राणे तसेच सर्व विभागप्रमुख यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाला विद्यार्थी आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या डॉ. के. जी. पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांना सोशल मीडियाचा जबाबदारीने आणि संयमाने वापर करण्याचा सल्ला दिला. त्यांनी सोशल मीडियाचे फायदे आणि तोटे, सायबर सुरक्षितता, वैयक्तिक माहितीचे संरक्षण तसेच डिजिटल माध्यमांचा योग्य वापर याबाबत विद्यार्थी आणि पालकांना महत्त्वपूर्ण माहिती दिली.

तंत्रनिकेतनाचे प्राचार्य पी. एम. राणे यांनी विद्यार्थ्यांचे व पालकांचे स्वागत करताना संस्थेची शैक्षणिक परंपरा, गुणवत्तापूर्ण शिक्षण, शिस्त, नियमित उपस्थिती, अभ्यासाचे नियोजन तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपलब्ध असलेल्या विविध सुविधा यांची माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत कौशल्य विकासावर भर देण्याचे आवाहन केले. इलेक्ट्रिकल विभागप्रमुख प्रा. जयंत बेंडाळे यांनी K-Scheme अभ्यासक्रम, प्रयोगशाळा, प्रात्यक्षिके, अंतर्गत मूल्यमापन, परीक्षा पद्धती आणि विभागातील विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. तर शिष्यवृत्ती आणि जात वैधता प्रमाणपत्रासंदर्भात सचिन बारी यांनी शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजना, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि वेळेत प्रक्रिया पूर्ण करण्याचे महत्त्व स्पष्ट केले.

मेकॅनिकल विभागप्रमुख प्रा. ए. एस. कोळी यांनी प्रशिक्षण आणि प्लेसमेंट प्रक्रियेबाबत माहिती देताना संस्थेतील अनेक विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये झालेली निवड पालकांसमोर मांडली. आगामी काळात सुमारे १५ नामांकित कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती देत उद्योग क्षेत्राशी असलेल्या संस्थेच्या मजबूत संबंधांचीही त्यांनी माहिती दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रूपाली चौधरी आणि प्रा. यशस्वीता गाजरे यांनी केले, तर आभार प्रा. रूपाली चौधरी यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि तंत्रनिकेतनातील सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.


Protected Content

Play sound