मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील कोथळी घराबाहेर बोलावून शिवीगाळ व मारहाण केल्याची तसेच धमकी दिल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली आहे. या घटनेत खिशातील पाच हजार रुपये हरवल्याने नुकसान झाल्याचेही तक्रारदाराने नमूद केले आहे. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
तक्रारीनुसार, १ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास तक्रारदार घरी असताना काही जण त्यांच्या घराबाहेर आले. यानंतर त्यांना घराबाहेर बोलावून एका व्यक्तीला घरी का येऊ देतो, असे म्हणत वाद घालण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर सार्वजनिक ठिकाणी शिवीगाळ करून चापट व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या घटनेदरम्यान अमित भगवान चौधरी याने ‘तुला जिवंत सोडणार नाही’, अशी धमकी दिल्याचेही तक्रारदाराने पोलिसांना सांगितले आहे. तसेच झालेल्या झटापटीदरम्यान तक्रारदाराच्या खिशातील ५ हजार रुपये हरवल्याने आर्थिक नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणात तक्रारदाराने अमित भगवान चौधरी, शिवाजी गोविंदा नेमाडे, स्वस्तिक अनंता चौधरी आणि कुणाल निना नारेखेडे यांच्याविरोधात कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. तक्रारदाराच्या जबाबानुसार पोलिसांनी प्रकरणाची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
या प्रकरणाचा तपास हेड कॉन्स्टेबल संदीप शांताराम वानखेडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. घटनेमागील नेमके कारण, मारहाणीचे स्वरूप आणि पैशांबाबतच्या आरोपांची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे.



