Home क्राईम जिल्ह्यात पोलिसांचे ‘ऑपरेशन ऑल आउट’! एकाच दिवशी २० लाखांची गावठी दारू जप्त

जिल्ह्यात पोलिसांचे ‘ऑपरेशन ऑल आउट’! एकाच दिवशी २० लाखांची गावठी दारू जप्त

0
3

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील अवैध धंदे, गुन्हेगारी प्रवृत्ती आणि कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचविणाऱ्या घटकांविरुद्ध जिल्हा पोलीस दलाने जोरदार मोहीम उघडली आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली १६ नोव्हेंबर रोजी पहाटेपासून संपूर्ण जिल्ह्यात एकाच वेळी ‘ऑपरेशन ऑल आउट’ ही विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत गावठी हातभट्टी दारू, अवैध दारूविक्री, जुगार, अंमली पदार्थ, अवैध शस्त्रे आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत गावठी दारू व रसायनांसह लाखोंचा मुद्देमाल जप्त व नष्ट करण्यात आला असून, एकूण १२० आरोपींविरुद्ध गावठी हातभट्टी दारूप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, चोरीस गेलेले आणि हरविलेले ४२ मोबाईल शोधून ते त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले.

जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांसह वाहतूक शाखेच्या माध्यमातून विशेष पथके तयार करून विविध ठिकाणी एकाच वेळी तपासणी आणि कारवाई करण्यात आली. अवैध गावठी हातभट्टी दारू निर्मिती व विक्री, देशी-विदेशी दारूची बेकायदेशीर विक्री, जुगार, अवैध शस्त्रे, अंमली पदार्थांची विक्री व वाहतूक तसेच अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक यांना लक्ष्य करण्यात आले. याशिवाय फरारी आरोपींचा शोध, हद्दपार गुन्हेगारांची तपासणी, प्रतिबंधात्मक कारवाई, समन्स व वॉरंट बजावणी आणि सार्वजनिक ठिकाणी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्धही कारवाई करण्यात आली.

या मोहिमेत सर्वाधिक मोठी कारवाई अवैध गावठी हातभट्टी दारूविरोधात करण्यात आली. जिल्ह्यात एकूण १२४ गुन्हे दाखल करून १२० आरोपींवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत ५ हजार ७२५ लिटर गावठी दारू जप्त अथवा नष्ट करण्यात आली, तर २८ हजार ९७२ लिटर रसायन जप्त अथवा नष्ट करण्यात आले. या कारवाईतील मुद्देमालाची एकूण किंमत २० लाख ६७ हजार २०० रुपये असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. देशी आणि विदेशी दारूच्या अवैध विक्रीविरोधातही पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये एकूण १२ गुन्हे दाखल करून १२ आरोपींवर कारवाई करण्यात आली. ९० मिलीच्या देशी दारूच्या ४२० बाटल्या आणि विदेशी दारूच्या २५ बाटल्या जप्त करण्यात आल्या. जप्त मुद्देमालाची किंमत ६१ हजार ८०५ रुपये आहे.

जुगारविरोधी कारवाईत जिल्हाभरात ४६ गुन्हे दाखल करण्यात आले असून, ६० जणांना आरोपी करण्यात आले आहे. या कारवाईत ९१ हजार ३३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच शस्त्र अधिनियमांतर्गत दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करून दोन आरोपींवर कारवाई करण्यात आली. यावेळी दोन तलवारी जप्त करण्यात आल्या असून, त्यांची किंमत ७५० रुपये नमूद करण्यात आली आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्धही पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर कारवाई केली. मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या ८७ चालकांवर कारवाई करण्यात आली. धोकादायक वाहन चालविण्याच्या कलम १८४ अंतर्गत सहा, तर मोटार वाहन कायद्याच्या कलम ६६/१९२ अंतर्गत ६३ कारवाया करण्यात आल्या. विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या १३३ जणांवर तसेच महामार्गावर अनधिकृत पार्किंग करणाऱ्या ६१ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. याशिवाय इतर वाहतूक नियमांच्या उल्लंघनाप्रकरणी १ हजार ५७ कारवाया करण्यात आल्या. या संपूर्ण मोहिमेतून ११ लाख ६९ हजार ३५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

हरविलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याच्या मोहिमेतही पोलिसांना यश आले. महिला पाच, पुरुष सात आणि मुली पाच अशा एकूण १७ व्यक्तींचा शोध घेण्यात आला. यामुळे संबंधित कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील भंगार दुकानांवरही पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले. एकूण १९० भंगार दुकानांची तपासणी करण्यात आली. यापैकी मुंबई पोलीस अधिनियम कलम १२४ अन्वये पाच कारवाया करण्यात आल्या. तसेच पानटपऱ्यांवर प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीविरोधात कोटपा कायद्यान्वये १०० गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईत २० हजार रुपयांचा मुद्देमाल अथवा दंडाची नोंद करण्यात आली.

अंमली पदार्थांविरोधातील कारवाईत एकूण ११ गुन्हे दाखल करण्यात आले असून, ११ आरोपींवर कारवाई करण्यात आली. यामध्ये दहा प्रकरणे अंमली पदार्थ सेवनाशी संबंधित असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या कारवाईत ३ किलो २५० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून, त्याची किंमत १ लाख ६२ हजार ५०० रुपये आहे. सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून शांतता भंग करणाऱ्या ७३ व्यक्तींविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. यासोबतच न्यायालयीन प्रक्रियेत महत्त्वपूर्ण असलेल्या समन्स आणि वॉरंट बजावणीवरही विशेष भर देण्यात आला. मोहिमेदरम्यान ३७६ समन्स आणि १६१ वॉरंट बजावण्यात आले. सराईत गुन्हेगारांची तपासणी करताना एकूण ५०७ गुन्हेगारांची पडताळणी करण्यात आली असून, त्यापैकी ११ जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. तसेच हद्दपारीचे आदेश असतानाही नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आठ हद्दपार आरोपींविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२ अन्वये कारवाई करण्यात आली.

या मोहिमेतील नागरिकांसाठी महत्त्वाची ठरलेली कामगिरी म्हणजे चोरीस गेलेले आणि हरविलेले मोबाईल फोन शोधण्याची कारवाई. CEIR पोर्टलच्या माध्यमातून पोलिसांनी एकूण ४२ मोबाईल फोन हस्तगत केले. विशेष म्हणजे, हे सर्व ४२ मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले. याशिवाय जिल्ह्यातील १८० हॉटेल आणि लॉजेसची तपासणी करण्यात आली. संशयास्पद हालचाली, नियमांचे उल्लंघन आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने या तपासणीला महत्त्व देण्यात आले.

जिल्ह्यात अवैध धंदे आणि गुन्हेगारी प्रवृत्तींना कोणत्याही परिस्थितीत थारा दिला जाणार नाही. नागरिकांची सुरक्षितता आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अशा विशेष मोहिमा यापुढेही सातत्याने राबविण्यात येतील, असा इशारा जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने देण्यात आला आहे. ही संपूर्ण मोहीम पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव येथील श्री. अशोक नखाते, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा, वाहतूक शाखा तसेच त्यांच्या अधिपत्याखालील अधिकारी आणि अंमलदार यांच्या विशेष पथकांनी यशस्वीपणे राबविली.


Protected Content

Play sound