Home क्रीडा सॉफ्टटेनिस स्पर्धेत देव ठाकूरची राज्यस्तरावर झेप!  

सॉफ्टटेनिस स्पर्धेत देव ठाकूरची राज्यस्तरावर झेप!  

0
4

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयातर्फे आयोजित १९ वर्षांखालील मुलांच्या आंतरशालेय सॉफ्टटेनिस विभागस्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत जळगावच्या विवेकानंद प्रतिष्ठान कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावीचा विद्यार्थी देव शांताराम ठाकूर याने राज्यस्तरीय स्पर्धेत धडक मारली आहे. त्याच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्या वतीने १९ वर्षांखालील मुलांच्या आंतरशालेय सॉफ्टटेनिस विभागस्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धा जळगाव येथील जिल्हा क्रीडा संकुलात पार पडल्या. जिल्ह्यातील विविध शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमधील खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेत आपले कौशल्य पणाला लावले. या स्पर्धेत विवेकानंद प्रतिष्ठान कनिष्ठ महाविद्यालयाचा अकरावीतील विद्यार्थी देव शांताराम ठाकूर याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. त्याने दाखविलेली जिद्द, मेहनत आणि खेळातील कौशल्याच्या जोरावर राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली. आता राज्यस्तरावर आपल्या खेळाची छाप पाडण्याची संधी देवला मिळणार आहे.

राज्यस्तरीय सॉफ्टटेनिस स्पर्धा २१ व २२ नोव्हेंबर २०२६ रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती येथील जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेत राज्यातील विविध विभागांतील निवड झालेले खेळाडू सहभागी होणार आहेत. त्यामुळे देव ठाकूर याच्या कामगिरीकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे. देवच्या या यशाबद्दल विवेकानंद प्रतिष्ठानच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य, महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी त्याचे अभिनंदन केले. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्याला शुभेच्छा देत पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन दिले.


Protected Content

Play sound