Home क्राईम जारगाव ग्रामसभेत माजी सरपंच व तरुणात वाद; मारहाण व जीवे मारण्याची धमकी...

जारगाव ग्रामसभेत माजी सरपंच व तरुणात वाद; मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार

0
11

पाचोरा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील जारगाव येथे २ ऑक्टोबर रोजी झालेल्या ग्रामसभेदरम्यान मच्छर प्रतिबंधक धुवारी मशिनच्या वापरावरून माजी सरपंच आणि एका तरुणामध्ये शाब्दिक वाद झाल्याची घटना घडली. या वादाचे रूपांतर मारहाणीत झाल्याचा आरोप असून, संबंधित तरुणाने पाचोरा पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे.

जारगाव ग्रामपंचायतीची ग्रामसभा २ ऑक्टोबर रोजी खडकदेवळा रोडवरील नाथ मंदिर येथे ग्रामपंचायत प्रशासक संदिप सुखदेव राठोड यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा सुरू असताना आनंद सखाराम पाटील यांनी गावात मच्छर मारण्यासाठी वापरण्यात येणारी धुवारी मशिन का वापरली जात नाही, अशी विचारणा केली. मशिन नादुरुस्त असल्यास ती दुरुस्त करून देण्याची तयारी असल्याचेही त्यांनी सांगितल्याचे नमूद आहे.

या विषयावरून ग्रामसभेस उपस्थित असलेले माजी सरपंच सुनिल युवराज पाटील आणि आनंद पाटील यांच्यात शाब्दिक वाद झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर सुनिल पाटील यांनी आपल्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आनंद पाटील यांनी केला आहे.

दरम्यान, या घटनेबाबत सुनिल पाटील यांनी वेगळी बाजू मांडली आहे. आनंद पाटील यांच्याकडे ग्रामपंचायतीची सुमारे ३६ हजार रुपये घरपट्टी थकीत असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच आनंद पाटील यांच्या घरातील सांडपाणी त्यांच्या प्लॉटमध्ये येत असून, त्याचा परिसरातील सुमारे पाच घरांना त्रास होत असल्याचे त्यांनी सांगितले. याच कारणावरून दोघांमध्ये पूर्वीपासून वाद असल्याचेही सुनिल पाटील यांनी नमूद केले.

ग्रामपंचायत प्रशासक संदिप राठोड यांच्या म्हणण्यानुसार, ग्रामसभा नियोजित ठिकाणी पार पडली असून सभेत मांडण्यात आलेल्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सभा संपल्यानंतर सांडपाण्याच्या प्रश्नावरून सुनिल पाटील व आनंद पाटील यांच्यात वाद झाल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रकरणी आनंद सखाराम पाटील यांनी सुनिल पाटील, भावेश पाटील आणि राहुल पाटील (सर्व रा. जारगाव, ता. पाचोरा) यांच्या विरोधात पाचोरा पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे. तक्रारीतील आरोपांची पडताळणी करण्यासह घटनेचा पुढील तपास पाचोरा पोलिसांकडून करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound