Home Cities अमळनेर लोंढवे फाट्याजवळ भीषण अपघात ; १०८ ॲम्बुलन्स चालकाचा दुर्दैवी मृत्यू

लोंढवे फाट्याजवळ भीषण अपघात ; १०८ ॲम्बुलन्स चालकाचा दुर्दैवी मृत्यू

0
10


अमळनेर- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील लोंढवे फाट्याजवळ रात्रीच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी अन् भीषण अपघाताची घटना घडली आहे. अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत १०८ ॲम्बुलन्सचे चालक अर्जुन हिरामण लोखंडे यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून आरोग्य वर्तुळात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, अर्जुन हिरामण लोखंडे (वय अंदाजे ५२) हे मूळचे करणखेडा येथील रहिवासी असून सध्या अमळनेर येथील राजे संभाजीनगर कॉलनीत कुटुंबासह वास्तव्यास होते. ते जानवे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात १०८ रुग्णवाहिकेचे (ॲम्बुलन्स) प्रामाणिक आणि तत्पर चालक म्हणून सेवा बजावत होते. सोमवारी, २८ सप्टेंबर रोजी रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास अर्जुन लोखंडे हे आपल्या मोटरसायकलने (क्रमांक एमएच ५४ ए ४८६८) कामावरून घरी अथवा इतर काही कामानिमित्त जात होते. लोंढवे फाट्यावरील हॉटेल रुद्राक्षी परिसराजवळून जात असताना एका भरधाव अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला भीषण धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, लोखंडे हे दुचाकीसह रस्त्यावर फेकले गेले अन् त्यांच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच करुण अंत झाला. अपघातानंतर अज्ञात वाहनचालक घटनास्थळावरून वाहनासह फरार झाला.

या अपघातादरम्यान एक अत्यंत धक्कादायक व संतापजनक बाब समोर आली आहे. अपघातानंतर अर्जुन लोखंडे हे तब्बल अर्धा तास जखमी अवस्थेत रस्त्यावर पडून होते. दुर्दैवाची बाब म्हणजे, वैद्यकीय आपत्कालीन सेवा पुरवणाऱ्या १०८ ॲम्बुलन्सचे स्वतः चालक असलेल्या लोखंडे यांच्यासाठीच रुग्णवाहिका वेळेवर पोहोचू शकली नाही. रुग्णवाहिका उशिरा पोहोचल्यामुळे अपघातातील आपत्कालीन मदतीला झालेल्या विलंबाबाबत नागरिकांमधून तीव्र संताप व प्रशासनाविरोधात प्रश्न उपस्थित केले जात आहेत. घटनास्थळी माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला असून, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. अमळनेर पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस करत आहेत.


Protected Content

Play sound