
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील योगेश्वर नगर परिसरातील गजानन पार्क येथील नर्मदेश्वर महादेव मंदिरातील दानपेटी चोरीच्या गुन्ह्याचा शनिपेठ पोलिसांनी अवघ्या १२ तासांत छडा लावला आहे. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी एक आरोपी तसेच एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून चोरीतील एकूण १२ हजार ५५० रुपयांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.

दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी जळगाव शहरातील योगेश्वर नगर परिसरातील गजानन पार्क येथे असलेल्या नर्मदेश्वर महादेव मंदिरातील दानपेटीतील रक्कम चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. याप्रकरणी योगेश्वर देविदास पाटील (रा. योगेश्वर नगर, जळगाव) यांनी शनिपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून शनिपेठ पोलीस ठाण्यात गुरनं. २०४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. मंदिरातील दानपेटी चोरीची घटना असल्याने पोलिसांनी या गुन्ह्याची गंभीर दखल घेतली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांना गुन्ह्याचा सखोल तपास करून आरोपींचा शोध घेण्यासह चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्याबाबत आवश्यक सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक जयस्वाल यांनी गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदारांना गुन्हा तातडीने उघडकीस आणण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरविण्याचे निर्देश दिले.
तपास पथकाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन मंदिरासह आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली. त्याचवेळी पोलिसांची गोपनीय यंत्रणाही सक्रिय करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेजमधून मिळालेल्या माहितीला तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीची जोड देत पोलिसांनी संशयितांचा माग काढला. या तपासाच्या आधारे पोलिसांनी चंद्रकांत भागवक पाटील (रा. दशरथ नगर, जळगाव) तसेच दशरथ नगर परिसरातील एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता, योगेश्वर नगर परिसरातील गजानन पार्क येथील नर्मदेश्वर महादेव मंदिराच्या दानपेटीतील रक्कम चोरी केल्याचे त्यांनी सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांच्याकडून एकूण १२ हजार ५५० रुपयांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.
घटना घडल्यानंतर अवघ्या १२ तासांच्या आत संशयितांचा शोध घेऊन चोरीतील रक्कम हस्तगत करण्यात शनिपेठ पोलिसांना यश आले. या गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ. अनिल सांळुखे हे करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीण गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांच्या नेतृत्वात करण्यात आली. पथकात संतोष खेडकर, अभिषेक कटारे, विजय खैरे, योगेश जाधव, अनिल सांळुखे, पराग दुसाने, अमोल वंजारी, निलेश घुगे, गणेश ढाकणे, योगेश साबळे, नवजित चौधरी यांच्यासह सीसीटीव्ही फुटेज विश्लेषक मुबारक देशमुख यांचा सहभाग होता.



