Home Cities जळगाव ईव्हीएमविरोधात अण्णा हजारेंनी पुन्हा रणशिंग फुंकावे; शिवराम पाटील यांचे आवाहन

ईव्हीएमविरोधात अण्णा हजारेंनी पुन्हा रणशिंग फुंकावे; शिवराम पाटील यांचे आवाहन

0
6

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी २०११ मध्ये लोकपाल आणि लोकायुक्त नियुक्तीसाठी ज्याप्रमाणे ऐतिहासिक जनआंदोलन उभे केले होते, त्याच धर्तीवर आता देशातील लोकशाही व मतदान प्रक्रियेच्या रक्षनासाठी ईव्हीएम (EVM) विरोधात पुन्हा एकदा तीव्र आंदोलन उभारावे, अशी आग्रही मागणी ‘महाराष्ट्र जागृत जनमंच’चे शिवराम पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. ईव्हीएमच्या वापरामुळे लोकशाही धोक्यात आली असून जनतेच्या मताची किंमत राहिली नाही, त्यामुळे या गंभीर मुद्द्यावर अण्णा हजारेंनी स्वतः पुढे येऊन देशव्यापी आंदोलनाचे नेतृत्व करावे, अशी विनंती करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर भूमिका मांडताना शिवराम पाटील यांनी स्पष्ट केले की, २०११ पासून लोकपाल व लोकायुक्त नियुक्तीसाठी झालेल्या प्रत्येक आंदोलनात आपण अण्णांच्या सोबत राहून त्यांच्या देशहिताच्या कार्याचा जवळून अनुभव घेतला आहे. पूर्वीच्या काळात अण्णांच्या आंदोलनाला काँग्रेस सरकारने योग्य वेळी प्रतिसाद न दिल्याने जनमानसात असंतोष निर्माण होऊन सत्ता परिवर्तन झाले होते. मात्र, सध्याच्या राजकीय परिस्थितीत ईव्हीएमच्या माध्यमातून निरंकुश सत्ता मिळवली जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला असून, यामुळे लोकशाहीचे मूलभूत हक्क आणि मतदारांचा अधिकार धोक्यात आला असल्याचे म्हटले आहे.

ईव्हीएममधील कथित गैरप्रकार आणि शंका दूर केल्याशिवाय देशातील खरी लोकशाही टिकू शकणार नाही, असे सांगत या यंत्राचा वापर पूर्णपणे बंद झाला पाहिजे, अशी भूमिका मांडण्यात आली आहे. यापूर्वी तरुण वर्ग आणि विविध राजकीय पक्षांनी याविरोधात आवाज उठवून काही प्रमाणात यश मिळवले असले, तरी जोपर्यंत ईव्हीएम पूर्णपणे बंद होत नाही तोपर्यंत अंतिम यश मिळणार नाही. त्यामुळे अण्णा हजारेंनी या लढ्यात थेट मैदानात उतरून दिल्ली किंवा राळेगणसिद्धी येथे व्यापक आंदोलनाची हाक द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

अण्णा हजारेंनी आपल्या देशहिताच्या ध्येयधोरणांमध्ये सातत्य ठेवून या महत्त्वपूर्ण मुद्द्यावर मौन सोडावे, अन्यथा त्यांच्या भूमिकेविषयी साशंकता निर्माण होऊ शकते, असा इशाराही यावेळी देण्यात आला. काँग्रेस नेते गांधी विचारांचे असल्यामुळे त्यांनी पूर्वी आंदोलनांची दखल घेतली होती, तर सध्याच्या राजकीय व्यवस्थेतून वेगळे अनुभव येत असले तरी भारतीय जनता आणि जग या प्रश्नावर नक्कीच लक्ष ठेवून आहे. त्यामुळे अण्णांनी कोणत्याही पक्षाबद्दल पक्षपातीपणाचा शिक्का बसू न देता, लोकशाही वाचवण्यासाठी पुन्हा एकदा जनआंदोलनाचे नेतृत्व करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

Protected Content

Play sound