यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे औचित्य साधून १५ नोव्हेंबर हा दिवस देशभारत ‘जनजातीय गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर, जळगाव जिल्ह्यात ११ ते १८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह-२०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाचा एक भाग म्हणून, दिनांक १४ नोव्हेंबर रोजी धरणगाव येथील ऐतिहासिक क्रांतीवीर ख्वाजाजी नाईक स्मृती स्मारकात विविध प्रेरणादायी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, ज्यात स्मारक परिसराची स्वच्छता, सायंकाळी भव्य दीपोत्सव आणि आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत.
आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास, देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे अतुलनीय योगदान, समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि पारंपरिक रूढी-परंपरांचे जतन व संवर्धन करण्याच्या उदात्त उद्देशाने शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात हा सेवा सप्ताह राबविला जात आहे. १४ नोव्हेंबर रोजी धरणगाव येथील कार्यक्रमाची सुरुवात स्मारक परिसराच्या व्यापक स्वच्छतेने होईल, ज्यातून ऐतिहासिक स्मारकांचे महत्त्व अधोरेखित केले जाईल. सायंकाळी, संपूर्ण स्मारक परिसर हजारो दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघेल. या दीपोत्सवाच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या स्वातंत्र्य लढ्यातील बलिदानाचा आणि ऐतिहासिक वारशाचा गौरव केला जाणार आहे.
या सोहळ्यास जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. त्यांच्यासह खासदार स्मिता वाघ, जिल्हाधिकारी रोहन घुगे, यावल एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार, धरणगावचे तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्यासह आदिवासी विकास विभागाचे अधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
दीपोत्सवासोबतच, याठिकाणी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांमधून आदिवासी समाजाच्या पारंपरिक कला, समृद्ध संस्कृती, देव-देवता, पूजा पद्धती, रूढी व परंपरांचे विहंगम दर्शन घडविले जाणार आहे. ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह-२०२६’ च्या माध्यमातून आदिवासी समाजातील थोर स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक व महापुरुषांच्या कार्याची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविणे, तसेच समाजाच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाबाबत जनजागृती करणे आणि शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती पात्र नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रशासनाचा मानस आहे.
क्रांतीवीर ख्वाजाजी नाईक स्मृती स्मारक, धरणगाव येथे १४ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या स्वच्छता अभियान, भव्य दीपोत्सव आणि आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांना नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. या माध्यमातून ‘जनजातीय गौरव दिन’ व ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह-२०२६’ मध्ये सक्रिय सहभाग नोंदवून आदिवासी बांधवांच्या गौरवशाली इतिहासाचा अभिमान बाळगावा, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांच्यामार्फत करण्यात येत आहे.



