Home Uncategorized किनगावच्या विद्यार्थ्यांची यशस्वी भरारी; शिष्यवृत्ती परीक्षेत 10 जणांची चमकदार कामगिरी

किनगावच्या विद्यार्थ्यांची यशस्वी भरारी; शिष्यवृत्ती परीक्षेत 10 जणांची चमकदार कामगिरी

0
9

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील किनगाव-डोणगाव रोडवरील इंग्लिश मिडीयम निवासी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी 2025-26 शैक्षणिक वर्षातील शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे. नुकताच जाहीर झालेल्या निकालात शाळेचे तब्बल 10 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले असून, या यशाबद्दल विद्यार्थ्यांवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

महाराष्ट्र शासनाच्या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत घेण्यात येणाऱ्या या परीक्षेत इयत्ता चौथी, पाचवी, सातवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. या परीक्षेत पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाकडून शिष्यवृत्तीच्या स्वरूपात आर्थिक सहाय्य दिले जाते. त्यामुळे या परीक्षेला विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टीने विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

यंदाच्या निकालात इंग्लिश मिडीयम निवासी पब्लिक स्कूलचे इयत्ता चौथीतील अनुराग योगेश खेवलकर, वेदांत संदीप तेली आणि रोशनी समाधान सपकाळे, इयत्ता पाचवीतील मंदार मनोज खेवलकर, इयत्ता सातवीतील मानस संजय पाटील, ऋतुजा बळीराम कोतवाय, भैरवी रविंद्र सोनवणे आणि प्रीतम प्रशांत दुसाने तसेच इयत्ता आठवीतील गौतमी जयंत पाटील यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केले. शाळेतील आणखी एक विद्यार्थीदेखील पात्र ठरल्याची माहिती संस्थेने दिली असून, एकूण 10 विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल स्कूलचे चेअरमन विजयकुमार देवचंद पाटील, सचिव तथा किनगाव विकास सोसायटीचे संचालक मनीष विजयकुमार पाटील, स्व. केतनदादा मल्टीपर्पज फाउंडेशनच्या संचालिका सौ. पूनम मनीष पाटील, मुख्याध्यापक अशोक प्रतापसिंग पाटील, उपमुख्याध्यापक सुहास भालेराव तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शाळेने सातत्याने गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिल्यामुळे दरवर्षी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश मिळत असल्याचे शिक्षकांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे पालकांमध्येही समाधानाचे वातावरण असून, संस्थेच्या शैक्षणिक कार्याचा गौरव होत आहे.


Protected Content

Play sound