जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्हा दूध संघातील चोरी प्रकरणी रात्रभर शहर पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडून ते तेथेच झोपले. यानंतर आज सकाळीदेखील त्यांचे आंदोलन सुरू राहणार असून भाजप देखील प्रति आंदोलन करणार आहे.
जिल्हा दूध संघात सुमारे दीड कोटी रूपयांच्या मालाची परस्पर विक्री केल्या प्रकरणी अध्यक्षा मंदाताई खडसे यांनी फिर्याद दाखल केल्यानंतर देखील गुन्हा दाखल करण्यात आला नाही. यामुळे आमदार एकनाथराव खडसे यांनी आपल्या समर्थकांसह रात्रभर शहर पोलीस स्थानकातच ठिय्या मांडला. त्यांनी तेथेच मुक्काम ठोकला.
दरम्यान, आज सकाळी मंत्री ना. गिरीश महाजन हे आपल्या समर्थकांसह शहर पोलीस स्थानकाच्याच आवारात प्रति आंदोलन करणार आहेत. अर्थात, ते एकनाथराव खडसे यांच्या विरोधात आंदोलनासाठी उतरत आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हा दौर्यावर आलेले प्रदेशाध्यक्ष जयंत चौधरी हे देखील आमदार एकनाथराव खडसे यांची भेट घेणार आहेत. यामुळे शहर पोलीस स्टेशनमध्ये राष्ट्रवादी विरूध्द भाजप असा मुकाबला रंगणार आहे. हा सामना पर्यायाने खडसे विरूध्द महाजन असाच होणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.