ममुराबादजवळ बसवर दगडफेक

जळगाव प्रतिनिधी | जळगाव आगारातून चोपड्याकडे जाणार्‍या बसवर ममुराबाद नजीक दगडफेक करण्यात आल्याची घटना आज घडली आहे.

राज्यात एसटी कर्मचार्‍यांचा संप सुरू असून याला जळगाव जिल्ह्यातही चांगला प्रतिसाद लाभला आहे. दरम्यान, प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून दोन वर्षांपूर्वी निवड करण्यात आलेल्या वाहक आणि चालकांना तात्काळ सेवेत रूजू करून घेत आज जळगाव येथून चार ठिकाणी बसेस सोडण्यात येणार असल्याचे नियोजन जळगाव आगारातर्फे करण्यात आले होते. यात धुळे, अमळेर आणि चोपडा येथे बसेस सोडण्यात येणार होत्या.

दरम्यान, आज सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे संपूर्ण प्रशिक्षण प्रदान करण्यात आलेल्या कर्मचार्‍यांच्याच हाती बस सोपविण्यात यावी यासाठी आक्रमक भूमिका घेतली. यामुळे बराच काळ बस सोडता आली नाही. अखेर जळगावहून चोपडा येथे एमएच २० बीएल-३३६१ या क्रमांकाची बस रवाना करण्यात आली.

ही बस ममुराबाद गावाजवळ आली असता अज्ञात लोकांनी यावर दगडफेक केली. यात बसच्या समोरील काचांना तड गेले. यात सुदैवाने कुणी जखमी झाले नसले तरी यामुळे चालक, वाहक आणि प्रवासी भयभीत झाले. या संदर्भात जळगाव आगाराच्या वतीने पोलिसात तक्रार करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!