तालुक्यात लंम्पी आजाराचा शिरकाव

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | पाचोरा तालुक्यात लंम्पी आजार दिवसेंदिवस वाढत असून कळमसरा व वरखेडी परीसरात मोठ्या प्रमाणात गुरांना लंम्पीसदृश आजाराचे लक्षणे आढळून आली आहेत. तालुक्यात आतापर्यंत ७० गुरांना लंम्पी आजाराची लागण झाली आहे. यापैकी कळमसरा येथे तीन बैल दगावले आहेत. तालुक्यात पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक व शिपायांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने कर्मचारी संख्येअभावी गुरांचे लसीकरण करण्यासाठी पशुधन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

तालुक्यात आज पर्यंत ९० टक्के गुरांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले असून पुढील दोन दिवसांत संपूर्ण गुरांचे लसीकरण पुर्ण होणार असल्याचे तालुका पशुधन विकास डॉ. सुजाता सावंत यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.

पाचोरा तालुक्यात वरखेडी व परीसरात २८ गुरांना लंम्पी आजाराची लागण झाली असल्याने लोहारी, वरखेडी, भोकरी, वाणेगाव, निंभोरी, सावखेडा बु”, सावखेडा खु” या गावांसाठी वरखेडी येथे साथरोग निवारण केंद्र सुरू करण्यात आले आहे. तर कळमसरा व शहापूरा परीसरात २७ गुरे आढळून आल्याने कळमसरा येथे साथरोग निवारण केंद्र सुरू केले आहे. याशिवाय लोहारा (४), अंबे वडगाव (५), नगरदेवळा (५), नेरी  (१) अशा ७० गुरांना लंम्पी आजाराची लागण झाली आहे. तर इतर काही गावात कमी प्रमाणात लक्षणे आढळून आलेल्या गुरांचे लसीकरण व तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहे. तालुक्यात पाच पशुधन विकास अधिकारी, पाच पशुधन पर्यवेक्षक व दहा शिपायांची पदे रिक्त असल्याने लसीकरण करण्यासाठी पशुधन विभागाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.

दहा हजार डोस उपलब्ध, मोफत लसीकरण –

पाचोरा तालुक्यातील गुरांना लंम्पी आजाराचे लसीकरणासाठी जळगाव येथील पशुधन विभागाच्या उपसंचालक यांचेकडून दहा हजार डोस उपलब्ध झाले असून हे लस मोफत देण्याची योजना पशुधन विभागाने हाती घेतली आहे.

Protected Content