अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी दिले ‘स्टेपलर गन थेरपी’चे धडे

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये शल्यचिकित्सा विभागातर्फे मुळव्याध शस्त्रक्रिया कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेत सोलापूर येथील अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी चार रुग्णांवर ‘स्टेपलर गन थेरपी’ शस्त्रक्रिया केल्या. यावेळी विभागाच्या डॉक्टरांनी या कार्यशाळेमध्ये उत्साह दाखवून शस्त्रक्रिया करण्याचे धडे गिरविले.

कार्यशाळेची सुरुवात सकाळी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी सोलापूर येथील वैशंपायंन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर, जळगावचे उप अधिष्ठाता तथा शल्यचिकित्सा विभाग प्रमुख डॉ. मारुती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, अधिसेविका प्रणिता गायकवाड प्रसंगी उपस्थित होते. डॉ.ठाकूर यांनी शल्यचिकित्सा आणि बधीरिकरण विभागातील सर्व प्राध्यापक, वरिष्ठ व कनिष्ठ निवासी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना शस्त्रक्रियेतील बारकावे सांगून पायाभूत बाबींची माहिती दिली.

यानंतर जळगाव जिल्ह्यातील ३८,७२,५१,४७ वर्षीय रुग्णांवर डॉ. संजीव ठाकूर यांनी स्टेपलर गन थेरपीद्वारे शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रिया कशा करतात याबाबतची शिकवण त्यांनी विभागातील सर्व डॉक्टरांना दिली. या शस्त्रक्रियेचा दीड ते दोन लाखांच्या वर खर्च येत असतो.  याला कुठलीही आरोग्य योजना नसल्यामुळे गरिबांना अशा शस्त्रक्रिया करता येत नाही. या शस्त्रक्रिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे नाममात्र दरात करण्यात आल्या.

गुदद्वार कट लावल्यावर डॉक्टर जखम बरी करण्यासाठी स्टेपलर गन थेरपीचा वापर करतात. त्याद्वारे बवासीर स्टेपलरद्वारे बाहेर काढतात.  यामुळे रुग्णाला या समस्येतून मुक्ती मिळते. ही शस्त्रक्रियेची पद्धत कमी त्रासाची, वेदनारहित, कमी वेळेची असते. या रुग्णाला तीन दिवसातच रुग्णालयातून सुट्टी मिळते, अशी माहितीही त्यांनी दिली.

यावेळी शल्यचिकित्सा विभाग प्रमुख डॉ.मारोती पोटे, बधिरीकरण शास्त्र विभाग प्रमुख डॉ. संदीप पटेल, सहयोगी प्रा. डॉ.संगीता गावित, डॉ. रोहन पाटील, डॉ. समीर चौधरी, डॉ. मिलिंद चौधरी, डॉ. सागर कुरकुरे, डॉ.  महेंद्र मल, डॉ. अनिल पाटील, डॉ. किरण सोनवणे, डॉ. शंतनू देशपांडे, डॉ. उमेश जाधव, डॉ. विपिन खडसे, डॉ. प्रज्ञा सोनवणे, डॉ.स्नेहा वाडे, डॉ.सुनील गुट्टे, डॉ. किरण शेंडगे, डॉ. जिया उल हक यांच्यासह शस्त्रक्रिया विभागाच्या परिचारिका नीला जोशी व त्यांचे सहकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content