अमळनेरचे विक्रमादित्य हेमंतकुमार महाले यांना डॉक्टरेट पदवी

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | अमळनेर येथील मूळ निवासी असलेले हेमंतकुमार महाले यांनी २०२१ मध्ये निर्मित व दिग्दर्शित ‘काळी माती’ या मराठी आणि ‘काली मिट्टी’ या हिंदी चित्रपटाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीची उत्कृष्ट चित्रपट व दिग्दर्शनाची ४४४ अतिशय प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत. परिणामी श्री. महाले यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या पुरस्कार प्राप्ती बाबतचे आतापर्यंतचे जगभरातील सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. त्याप्रीत्यर्थ त्यांना द वर्ल्ड रेकॉर्ड युनिव्हर्सिटीतर्फे डॉक्टरेट ही पदवी दिल्ली येथे झालेल्या भव्य समारोहात ख्यातनाम गायक व संगीतकार हंसराज हंस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली आहे.

इंग्लंड, अमेरिका व भारत या तीनच ठिकाणी हे विद्यापीठ आहे. आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल मध्येही श्री. महाले व त्यांच्या चित्रपटांना सर्वोत्कृष्ट, सर्वाधिक व विक्रमी पुरस्कार मिळाल्यामुळेही सदर विद्यापीठाने श्री.महाले यांना डॉक्टरेट पदवीसाठी पात्र ठरविले आहे. श्री. महाले यांचे शालेय शिक्षण अमळनेर येथील जी.एस. हायस्कूल येथे तर महाविद्यालयीन शिक्षण अमळनेर येथीलच प्रताप महाविद्यालयात झाले आहे. दीर्घकाळ त्यांनी स्टेट बँकेतही नोकरी केली आहे. शालेय जीवनापासूनच त्यांना गायनाची व संगीताची आवड होती. १९७८ मध्ये हेमंतकुमार अँड पार्टी या नावाने खानदेशातील कलावंतांना जमवून मोठ्या आर्केस्ट्रास त्यांनी प्रारंभ केला. त्यानंतर पुणे ,मुंबई व औरंगाबाद येथील नामवंत कलावंतांचाही त्यांनी त्यांच्या आर्केस्ट्रात समावेश केला.

हल्ली मुंबई स्थित असलेल्या श्री. महाले यांचा म्युझिकल ग्रुप आहे. भारतात आणि भारताबाहेरही त्यांचे अनेक म्युझिकल कार्यक्रम झाले आहेत. त्यांना युट्युबचे प्लॅटिनम बटन प्राप्त आहे. त्यांची व्ह्यूवरशिप ८५ कोटींपेक्षा अधिक आहे. त्यांच्या व्ह्यूवरशिपमध्ये रोज होणारी वृद्धी ही लाखांच्या घरात असते. २३ लाखाहून अधिक त्यांचे सबस्क्राईबर आहेत. संगीत क्षेत्रातील विकिपीडिया म्हणूनही ते ख्यातनाम आहेत. असंख्य गाणी त्यांना मुखोदगद आहेत. असंख्य गाण्यांचे गायक, गायिका, गीतकार, संगीतकार, चित्रपट, नायक व नायिका यांची नावे त्यांना मुखोदगद आहेत. म्युझिकल शो क्षेत्रात ‘शो मॅन ऑर्गनायझर’ अशी त्यांची ख्याती आहे.

भल्या मोठ्या संख्येतील विविध वादकांच्या ताफ्यासह होणाऱ्या त्यांच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते नेहमीच आगळे वेगळे संगीतिय प्रयोग करीत असतात. देशातील अग्रगण्य कलावंतांना सोबत घेऊन कार्यक्रम करताना त्यांनी अनेक नवख्या गुणी कलावंतांनी मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. त्यांच्यामुळे अनेक कलावंत नावारुपाला आले आहेत.

साधी राहणी, निगर्वी व्यक्तिमत्व व मधुरभाषि म्हणून श्री. महाले परिचित आहेत. कला, संगीत व चित्रपट क्षेत्रात त्यांना कोणतीही पारिवारिक पार्श्वभूमी नाही. कोणीही गॉडफादर नाही. त्यामुळेच एका छोट्याशा गावातून कला जीवनाचा श्रीगणेशा करून यश व कीर्तीच्या माध्यमातून साऱ्या जगाला कवेत घेणारी, गाठलेली उंची व यश विशेष अधोरेखित ठरते. यशासाठी धडपडणाऱ्या अनेक कलावंतांसाठी श्री. महाले सर्वार्थाने आदर्श व प्रेरणा आहेत. श्री महाले हे मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार डिगंबर महाले व मुंबई महापालिकेचे उपायुक्त संजय महाले यांचे ज्येष्ठ बंधू आहेत.

Protected Content