चिंचोली येथील मेडिकल हबच्या प्रकल्पाला होणार लवकरच सुरुवात

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील चिंचोली येथे वैद्यकीय शिक्षणाचे हब यापूर्वीच २०१७ साली मंजूर झाले आहे. आज मंगळवार दि.२७ सप्टेंबर रोजी मुंबई येथील वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे अधिकारी यांच्यासह सर्व अधिष्ठाता, कर्मचारी यांनी चिंचोली येथे जाऊन या हबची सविस्तर पाहणी केली.

मेडिकल हबचे काम पुढील टप्प्यात लवकरच सुरू करण्यात येईल. याबाबतचे नियोजन दिवसभरात करण्यात आले. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे सहसंचालक डॉ.अजय चंदनवाले, आंतरराष्ट्रीय वित्तीय कंपनीचे बालसुब्रमण्यम राममूर्ती, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या प्रभारी अधिष्ठात्या डॉ. तबस्सुम पानसरे, शासकीय होमिओपॅथी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश महाजन, वैद्यकीय  शिक्षण व संशोधन खात्याचे मंत्री गिरीश महाजन यांचे प्रतिनिधी अरविंद देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता पी.पी. बिऱ्हाडे, चिंचोली गावाचे तलाठी सुधाकर पाटील उपस्थित होते.

जळगाव जिल्ह्यात वैद्यकीय अभ्यासक्रमांकरीता तालुक्यातील चिंचोली येथे मेडिकल हब हा प्रोजेक्ट २०१७ साली वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे मंत्री गिरीश महाजन यांनी मंजूर केला होता. त्याचे कामकाज सुरू करण्यासंदर्भात प्राथमिक हालचाली पूर्ण झाले आहेत.  पुढील टप्प्यातील कामकाज सुरू करण्याबाबत वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे अधिकारी डॉ. अजय चंदनवाले जळगावात आले होते. यावेळी त्यांच्यासह अधिष्ठाता आणि कर्मचाऱ्यांनी चिंचोली येथे प्रत्यक्ष जाऊन सलग तीन तास सविस्तर पाहणी केली.

वैद्यकीय, आयुर्वेदिक, होमिओपॅथी,  दंतशल्य आणि फिजिओथेरपी महाविद्यालय उभारण्यासंदर्भामध्ये यावेळी चर्चा झाली. नकाशे पाहून जागा कुठून-कुठवर आहे. प्रकल्पामध्ये काही अडचणी आहेत काय, तसेच महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराकडील जागा अधिकाऱ्यांनी पाहिली.

आगामी काळामध्ये मेडिकल हबच्या कामाला गती देण्यासंदर्भामध्ये सातत्याने लक्ष देऊन याबाबत सहकार्य केले जाईल. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयातर्फे कागदपत्रांची पूर्तता वेळेवर करण्यासंदर्भात कायम गती राहील,  अशी माहिती यावेळी डॉ. अजय चंदनवाले यांनी दिली. प्रकल्प पूर्णत्वास जाण्यासाठी सर्व महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांना आवश्यक ती कागदपत्रे पूर्ण करून तातडीने पाठवण्याबाबत सूचना देण्यात आल्या.

यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, वरिष्ठ लिपिक राजेंद्र वैद्य, जनसंपर्क सहाय्यक विश्वजीत चौधरी, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयातील लघुलेखक संजय सोनवणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सुशांत मेढे, ज्ञानेश्वर कंखरे आदी उपस्थित होते.

Protected Content