भडगावात नियमांचे उल्लंघन केल्यास होणार कठोर कारवाई !

भडगाव प्रतिनिधी । कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवून दिलेल्या मागर्दशक सूचनांसह नियमाचे पालन न केल्यास कठोर कारवाईसह आस्थापन ही सील करण्यात येतील असे निर्देश तहसीलदार सागर ढवळे यांनी व्यापारी मंडळाच्या बैठकीत दिले. यावेळी मुख्यधिकारी विकास नवाळे व पोलीस उपनिरीक्षक अंनत पठारे उपस्थित होते.

राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हाधिकारी यांनी आस्थापनासाठी निर्देश जाहीर केले आहेत. त्यानुसार निर्देश देण्यासाठी तहसीलदार यांच्या दालनात सर्व व्यापारी मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानुसार सर्व प्रकारच्या शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक व प्रशिक्षण केंद्रे, खाजगी शिकवणी क्लासेस, सर्व प्रकारचे कोचिंग क्लासेस बंद राहतील. अभ्यासिका ( लायब्ररी व वाचनालये) यांना केवळ ५०% क्षमतेच्या मर्यादेत सुरु ठेवता येतील. 

सर्व प्रकारचे धार्मिक कार्यक्रम, जत्रा, यात्रा, उरुस, दिंडी व तत्सम धार्मिक कार्यक्रम यांना बंदी राहील. सर्व धार्मिक स्थळे ही एका वेळेस केवळ १० लोकांच्या मर्यादेच्या उपस्थितीत संबंधित पूजा-अर्चा यासारख्या विधीकरीता खुली राहतील. सर्व प्रकारचे सिनेमागृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, बगीचे, नाट्यगृहे, प्रेक्षकगृहे व इतर संबंधित ठिकाणे बंद राहतील. सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, मनोरंजनात्मक, शैक्षणिक, सांस्कृतिक व तत्सम कार्यक्रम यांना बंदी राहील. तसेच सर्व प्रकारच्या क्रिडा स्पर्धा, प्रदर्शने, मेळावे, संमेलने यांना बंदी राहील. शुक्रवारी होणारा आठवडा बाजार बंद राहणार आहेत. 

कायद्याव्दारे बंधनकारक असणार्‍या वैधानिक सभांना केवळ ५० लोकांचे उपस्थितीच्या मर्यादेत परवानगी राहील. लग्न समारंभ, कौटुंबिक कार्यक्रम यांचे आयोजन करतांना या कार्यालयाकडून लागू करण्यात आलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील. कोणत्याही परिस्थितीत ५० लोकांच्या उपस्थितीच्या मर्यादेचा भंग होणार नाही, याची संबंधितांनी गांभिर्याने दक्षता घ्यावी. मंगलकार्यालय ने नियम भंग केल्यास कार्यालय सील करण्यात येईल, सर्व प्रकारच्या खाजगी आस्थापनांनी त्यांच्या आस्थापनेवरील सर्व कर्मचार्‍यांची वेळोवेळी आरोग्य तपासणी करुन घेणे, त्यांच्याकडून सोशल डिस्टन्सींग, मास्कचा वापर याबाबींचे पालन करुन घेणे बंधनकारक राहील. तसेच कोविड-१९ ची लक्षणे दिसून येणार्‍या संशयित कर्मचार्‍यांची कोविड-१९ चाचणी करुन घेण्याची जबाबदारी संबंधित आस्थापनांची राहील.

रात्री दहा वाजेपासून सकाळी पाच वाजेपर्यंत संचारबंदी घोषित करण्यात येत आहे. मात्र या संचारबंदी दरम्यान आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित शासकीय अस्थापना, अत्यावश्यक वैद्यकीय सेवा देणारे घटक, संचारबंदीच्या कालावधीत कंपनीत जाणारे व येणारे कामगार तथापि संबंधित कामगारांना ओळखपत्र सोबत बाळगणे बंधनकारक राहील कोणत्याही कार्यक्रम, सोहळ्यासाठी नगरपरिषद, ग्रामपंचायत तसेच पोलीस प्रशासनाची परवानगी अत्यावश्यक आहे. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर बाब ही भारतीय दंड संहिता, १८६० (४५) चे कलम १८८, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ५१ ते ६० तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील व सबधितांचे आस्थापना ही सील करणार असल्याचे निर्देश तहसीलदार सागर ढवळे यांनी दिले आहे

 

 

 

Protected Content