रावेरचे माजी नगराध्यक्ष हरीश गणवानी भाजपच्या वाटेवर

harish ganwani रावेर शालीक महाजन । येथील माजी नगराध्यक्ष हरीश गणवानी हे भाजपच्या वाटेवर असून ते आज पक्षात प्रवेश करणार आहेत. यामुळे मतदारसंघातील समीकरणांवर परिणाम होणार असल्याने खळबळ उडाली आहे.

आज धुळे येथे भाजपचे कार्याध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यात मधुकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद महाजन हे आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आज सकाळीच न्हावी येथून ते धुळे येथे रवाना झाले आहेत. दरम्यान, आजच्याच कार्यक्रमात रावेरचे माजी नगराध्यक्ष हरीश गणवानी हेदेखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. गणवानी हे रावेरच्या राजकीय वर्तुळातील मातब्बर व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जात असून त्यांनी दोनदा शहराच्या नगराध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे. त्यांच्या भाजपमधील प्रवेशामुळे शहरच नव्हे तर मतदारसंघातील राजकारणात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, या संदर्भात प्रस्तुत प्रतिनिधीने हरीश गणवानी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचे विचार तसेच ना. हरीभाऊ जावळे यांच्या सर्वसमावेशक आणि विकासाभिमुख वाटचालीमुळे प्रभावीत होऊन आपण भाजपमध्ये प्रवेश करत आहोत. आगामी काळात पक्षाच्या ध्येयधोरणांनुसार आपली वाटचाल राहणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

Protected Content