४० लाख ट्रॅक्टर दिल्लीत आणण्याचा राकेश टिकैत यांचा इशारा

 

 

चंदीगढ : वृत्तसंस्था । संयुक्त किसान मोर्चाने रेल रोकोची हाक दिलेली असताना दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचे नेते राकेश टिकैत यांनी शेतकऱी आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.  सरकार दुर्लक्ष करत असेल तर ४० लाख ट्रॅक्टर दिल्लीत दाखल होतील, असा निर्वाणीचा इशारा त्यांनी  दिला आहे.

 

ते हरियाणातील हिसारमधील खरक पुनिया येथे आयोजित महापंचायतीत बोलत होते. यावेळी त्यांनी सरकारच्या धोरणांवर घणाघाती टीका केली.

 

मागील कित्येक दिवासांपासून दिल्लीच्या वेशींवर शेतकरी आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारने लागू केलेले कृषी कायदे रद्द करण्यात यावेत. किमान आधारभूत किमतीसंबंधी कायदा करावा, अशा मागण्या या शेतकऱ्यांच्या आहेत. सरकारसोबत बैठका होऊनही शेतकऱ्यांच्या या मागण्यांसंबंधी अद्याप सर्वमान्य तोडगा निघालेला नाही. त्यामुळे अजूनही दिल्लीतील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरुच आहे.

 

याविषयी  राकेश टिकैत म्हणाले की, “या लढ्यात शेतकऱ्यांना बलिदान द्यावे लागेल. शेतकरी उभ्या पिकाला आग लावतील. शेतकऱ्यांच्या पिकासंबंधीचा निर्णय हे शेतकरीच घेतील. यानंतर हे आंदोलन आणखी तीव्र केले जाणार आहे. आगामी काळात दिल्लीमध्ये ४० लाख ट्रॅक्टर पोहोचतील. शेतकरी शेतात पीक घेतील तसेच ते आंदोलनही करतील.

 

 

दरम्यान, किसान संयुक्त मोर्चाने आज देशभरात दुपारी  रेल्वे रोको करण्याचे आवाहन केले होते. किसान मोर्चाच्या आवाहनानंतर देशात मोठ्या प्रमाणत रेल्वे अडवण्यात आल्या. महाराष्ट्रातही या आंदोलनाचे पडसाद उमटले. नांदेड जिल्ह्यातील किनवट  व लासूर स्टेशन रेल्वेस्थानकावर माकपाच्या वतीने रेल रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलकांनी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलकांना ताब्यात घेतले.

Protected Content