हा तर ‘कॉमेडी एक्सप्रेस’चा दुसरा सीझन ! : संजय राऊत

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवसेना पक्षात फुट पाडण्याचा कुणालाही हक्क नाही. आधीच त्यांच्या आमदारांच्या अपात्रतेची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल असून अपात्रतेच्या भितीतून खासदार फोडण्याची धडपड सुरू आहे. हा सर्व प्रकार म्हणजे ‘कॉमेडी एक्सप्रेस’चा दुसरा अंक असल्याची खोचक टीका शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

शिवसेनेच्या १२ खासदारांनी शिंदे गटात दाखल होण्याचे संकेत देताच खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यात ते म्हणाले की, माझे आताच उध्दवजी ठाकरे यांच्यासोबत बोलणे झाले. फुटीची माहिती मिळताच अरविंद सावंत, राजन विचारे, प्रियंका चतुर्वेदी हे माझ्याकडे आले. इतर देखील येत आहेत. सध्या सुरू असलेला प्रकार म्हणजे कॉमेडी एक्सप्रेस सीझन-२ होय. सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठासमोर फुटीर गटाच्या भवितव्याचा निर्णय लागणार आहे. १६ आमदारांच्या अपात्रतेसाठी आम्ही अर्ज दाखल केला आहे. यात आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे.
शिंदे गट हा घाईघाईने फुट पाडत आहे. स्वत:चे आमदार सांभाळण्यासाठी ही धडपड सुरू असल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी केली. सोडून गेलेल्यांना असे करण्याचा कोणताही अधिकार नाही. लोकांना भ्रमीत करण्यासाठी हा प्रकार सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. एकनाथ शिंदे हे स्वत: आपल्या सहकार्‍यांसह अपात्र होणार आहेत. यामुळे खुर्ची वाचवण्यासाठी सर्व प्रकार सुरू असल्याची टीका त्यांनी केली.

Protected Content