फैजपूर ता. यावल प्रतिनिधी । आपल्या प्रदिर्घ सेवा काळात हजारो विद्यार्थ्यांना घडवून सेवानिवृत्तीनंतरही तोच छंद जोपासून त्या कामात झोकून देणे म्हणजे एक तपश्चर्याच आहे, असे महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी सांगितले.
जळगाव येथील सेवानिवृत्त शिक्षक चित्रकार लिलाधर कोल्हे उर्फ एल. झेड. कोल्हे यांना नुकतेच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते ‘कलागौरव’ पुरस्कार-२०२१ देण्यात आला. त्यानिमित्त फैजपूर येथील सतपंथ मंदिर संस्थानचे गादीपती तथा अखिल भारतीय संत समितीचे खजिनदार महामंडलेश्वर श्री जनार्दन हरीजी महाराज यांनी लिलाधर कोल्हे सरांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा सपत्नीक गुणगौरवपर शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला.
मुलांना वाचनाची गोडी लागावी या दृष्टीने सातत्याने प्रयत्नशील असलेल्या लेखिका व संकल्प इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका डॉ. ज्योती शंकर(राज) परब लिखित चित्रमय रामायण या पुस्तकातील प्रसंग चित्रमय स्वरुपात रेखाटन करणारे जळगाव येथील राज्य पुरस्कार प्राप्त कला शिक्षक व प्रसिध्द चित्रकार लिलाधर कोल्हे यांना अखिल भारतीय कला, क्रीडा व सांस्कृतिक अकादमीच्या वतीने बाबासाहेब पुरंदरे यांच्याहस्ते ‘कलागौरव’ पुरस्कार-२०२१ प्रदान करून नुकतेच सन्मानित करण्यात आले.
एखाद्या कलावंताचा त्याच्या घरी जाऊन सत्कार करण्याची महाराजांची ही पहिलीच वेळ असून चित्रकार एल. झेड. कोल्हे यांच्या जीवनातीलही हा अनमोल आनंदाचा क्षण असून मी धन्य झालो असे चित्रकार कोल्हे यांनी सांगून रामायण, महाभारत, अजिंठा लेणी क्षणचित्रांसह सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक,साहित्यिक, संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींची रेखाटलेली रंगीत छायाचित्रे महाराजांनी पाहून आनंद व्यक्त केला.
यावेळी प्रसिध्द साहित्यिक कथा-कथनकार प्रा.व.पु. होले, मसाकाचे संचालक नरेंद्र नारखेडे, शिवाजी वराडे, मुख्याध्यापक श्रीधर चांगो सरोदे सर, प्रा. उमाकांत पाटील यांनीही श्री कोल्हे सरांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी त्यांच्या सुविद्य पत्नी नलीनी कोल्हे, दिलीप कोळंबे, सौ.ज्योती कोळंबे, संगिता चौधरी आदी उपस्थित होते.