जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचा पोलीस कर्मचारी निलंबित

जळगाव प्रतिनिधी । अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारा डंपर कारवाईसाठी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात आणण्यात आला असता. डंपरवर कारवाई करण्यापुर्वी सोडून देण्याच्या प्रयत्न केला. परंतु ठाणे अंमलदारने हा प्रयत्न हाणून पाडीत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे अवैध वाळूचे डंपर सोडून देणार्‍या जिल्हापेठ मधील संदीप पाटील या कर्मचार्‍याला पोलीस अधीक्षकांनी निलंबित केले आहे.

अधिक माहिती अशी की, १५ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास तालुका तहसील कार्यालयातील महसूल विभागाने अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या डंपर (क्रमांक एमएच १९ सीवाय ३६०७)ला पकडून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात आणण्यात आला होता. ही माहिती डंपरच्या मालकाला कळविल्यानंतर काही वेळातच जिल्हापेठ पोलीस ठाण्याचा कर्मचारी संदिप पाटील पांडे चौकात पोहचला. जप्त केलेल्या डंपरची चावी ठाणेअंमलदारच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली होती. संदिप पाटील पोलीस ठाण्यात येवून त्याने ड्रॉवरमधून ती चावी काढीत ती डंपरचालकाच्या हातात दिली. यावेळी डंपरचालक हा डंपर घेवून जात असतांना ठाणेअंमलदारने तो डंपर रोखून धरत चावी काढून घेतली. परंतु ठाणे अंमलदारने हा प्रयत्न हाणून पाडीत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाची दुसर्‍या दिवशी दिवसभर चर्चा सुरु होती. याप्रकरणी दोन दिवसानंतर म्हणजेच १७ ऑक्टोंबर रोजी तलाठी रुपेश ठाकूर यांच्या फिर्यादीवरुन डंपरचलक मयूर दिनकर पाटील रा. साकेगाव ता. भुसावळ याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. अनेकदा महसूल, पोलीस व वाळू माफियांचे अर्थपूर्ण संबंध असल्याचे उघड झाले आहे. अशा प्रकरणात पोलीस कर्मचार्‍यांना निलंबीत देखील करण्यात आले आहे. असा प्रकार पुन्हा उघडकीस आल्यानंतर पोलीस खात्याची बदनामी होत असल्याने पोलीस अधीक्षकांनी जिल्हापेठचे पोलीस निरीक्षकांसह संबंधित कर्मचार्‍याला चौकशीसाठी बोलाविले होते. प्राथमिक चौकशी सुरु असतांना जिल्हापेठचा संदीप पाटील या पोेलीस कर्मचार्‍याला निलंबित करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले.

Protected Content