दहीगावात प्रथमच पार पडली बैलगाडी शर्यत

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील दहिगाव येथील ७१७१ सरकार ग्रुपच्या वतीने मार्फत १५ मे रोजी भव्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. यात परिसरातील २५ स्पर्धकांनी आपले नाव नोंदवून सहभाग घेतला होता. या स्पर्धत प्रथमच प्रामुख्याने शेजारच्या मध्य प्रदेश राज्यासह चोपडा, मुक्ताईनगर, जामनेर या भागातून आलेल्या शेतकरी बांधवांनी या शर्यतीत सहभागी झाले होते. या शर्यतीत यावल तालुक्यातील मारूळ येथील शरीफ भाई मारूळवाले या शेतकऱ्याने प्रथम क्रमांक पटकाविला तर पहुर येथील सोनू पांढरे याने द्वितीय क्रमांक पटकाविला व तिसरा क्रमांक मोहरद तालुका चोपडा येथील मुद्याद अब्बास तडवी यांनी नंबर पटकावला. प्रथम क्रमांक पंधरा हजार रुपये किमतीचे, फ्रिज द्वितीय क्रमांकास १२ हजार रुपये किमतीचा एलईडी टीव्ही आणि तृतीय क्रमांक सहा हजार रुपये किंमतीचे कुलर अशा स्वरूपात पंच कमिटी ग्रुप अध्यक्ष करण अरुण महाजन व ७१७१ सरकार ग्रुप सदस्यां मार्फत वितरण करण्यात आले.
कार्यक्रमासाठी दहिगावचे प्रथम नागरिक सरपंच अजय अडकमोल, याच्यासह मारूळ गावाचे उपसरपंच सलामत अली , ग्रामपंचायत सदस्य मारूळ मतीउर्र रहेमान पिरजादे व दहिगाव येथील समाधान चौधरी, दीपक पाटील, योगेश माळी, आनंद पाटील हे पंच होते तर आयोजक म्हणून अजय पाटील, सचिन पाटील, निखिल पाटील ,पप्पू पाटील, भूपेंद्र कोळी, विपुल पाटील, राज पाटील, पारस महाजन, दिनेश पाटील, दीपक पाटील, दीपक कुंभार, जीवन महाजन, मयूर पाटील, विनोद पाटील, चेतन चौधरी, हेमंत पाटील यांचा समावेश होता.
सदरची स्पर्धा ही शांततेत पार पाडण्यासाठी वरील सदस्यांनी परिश्रम घेतले दुपारी १२ ते ४.३० वाजेच्या दरम्यान ही स्पर्धा पार पडली. सायंकाळी पाच वाजता स्पर्धेतील विजेत्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. या ठिकाणी आरोग्यदूत म्हणून स्थानिक आरोग्य सेवक उपस्थित होते तर वाढते तापमान असल्याने थंड पेय सुध्दा उपलब्ध होते. स्पर्धा २२ ते २५ वयोगटातील तरुणांनी यशस्वी करून दाखविली. स्पर्धेचे स्वरूप नऊ फेऱ्या नंतर तीन सेमी फायनल आणि शेवटची फायनल अशा स्वरूपात होते. स्पर्धेमध्ये दहिगाव, नायगाव, शिरसाट, साखळी, बारूळ, इच्छापुर, मध्य प्रदेश, मुक्ताईनगर, कठोरा, मोहरक, चोपडा, पहूर, चोपडा येथील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. करण महाजन यांच्या शेतात ही स्पर्धा पार पडली. प्रथमच वर्ष असल्याने या स्पर्धेत प्रेक्षकांची मोठी उपस्थिती होती. कुठलाही गैरप्रकार व अनुचित प्रकार येथे घडला नाही अशाच स्पर्धा सर्व युवकांनी पार पाडाव्यात व पाडायला पाहिजेत असेच अनुकरण करायला हवे असे सुज्ञ गावकऱ्यांकडून बोलले जात आहे.

Protected Content