…हे तर सुरेशदादा गटासाठी ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’! – भाजपचा पलटवार

जळगाव प्रतिनिधी । सुरेशदादा जैन यांनी विधानसभा निवडणुकीची इच्छा व्यक्त करणे हे तर ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ या प्रकारातील असल्याचा पलटवार भाजपचे सरचिटणीस महेश जोशी यांनी एका पत्रकान्वये केला आहे.

याबाबत वृत्त असे की, माजी मंत्री सुरेशदादा जैन हे पुन्हा विधानसभेची निवडणूक लढविणार असल्याची माहिती माजी उपमहापौर सुनील महाजन यांनी एका पत्रकार परिषदेत दिली असून खुद्द सुरेशदादांनी याला दुजोरा दिला आहे. यामुळे जळगावच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या पार्श्‍वभूमिवर, भाजपचे सरचिटणीस महेश जोशी यांनी एका पत्रकाच्या माध्यमातून पक्षाची भूमिका स्पष्ट करतांना जैन गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. यात म्हटले आहे की, १९९० साली भुसावल विधानसभा राजाभाऊ पवार भाजपा कडून उमेदवारी करताना पराभूत झाले. त्यानंतर शिवसेनेकडून दिलीप भोळे हे विजयी झाल्याने ही जागा शिवसेनेला सुटली. यामुळे जो पक्ष विजयी होतो त्याचा तो मतदार संघ या नियमाने जळगाव विधानसभा २०१४ साली भाजपाने जिंकल्याने या पुढे भाजपच या जागेवर लढेल यात तीळमात्रही शंका नाही. या मुळे विरोधकांनी ‘मुंगेरी लाल के हसीन सपने’ पाहणे सोडून द्यावे. युती म्हणजे ही काही खाविआ नसून भाजप-शिवसेना हे राष्ट्रीय पक्ष आहेत. त्यामुळे जागा संदर्भातला निर्णय हा श्रेष्ठी योग्य त्या वेळी घेतीलच असा टोला यात मारण्यात आला आहे.

या निवेदनात पुढे म्हटले आहे की, गेल्या ३५ वर्षात जो निधी आला नाही तो ह्या साडे चार वर्षात भाजप ने आणला व ह्या विकास कामांमध्ये कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार न होता भ्रष्टाचार विरहित विकास कामे अशी जळगाव ची ओळख झाली. आपण ३५ वर्ष जळगाव शहर व ग्रामीण चे आमदार होते त्यात आपली कामे कामे म्हणजे वाघूर घोटाळा, अटलांटा,घरकुल साठी घेतलेले हुडकोचे कर्ज, विमानतळ असे अनेक घोटाळे असून त्यातील एका घरकुल प्रकरणाचा निकाल लवकरच लगणार असून आपण निवडणूक लढवण्यास पात्र आहे का? असा प्रश्‍न यात विचारण्यात आला आहे. यामुळेच २०१४ च्या विधान सभेत सुमारे ४६ हजारच्या फरकाने जनतेने आपल्याला घरी बसवले. यानंतर ऑक्टोबर २०१८ च्या म.न.पा निवडणुकीत आपल्या पक्षाला फक्त १५ जागा व भाजप च्या ५७ जागा निवडून देवून जनतेने भाजप च्या बाजूने कौल
दिला असून जनतेला भ्रष्टाचार मुक्त कामे हवी आहे हेच ह्या निकालातून स्पष्ट होते. गेल्या ३५ वर्षात बंगल्या वरून महापालिकेची सत्ता राबवण्याची प्रथा ह्या जळगाव शहराने पहिली आहे. या साडेचार वर्षात जळगाव शहराच्या नागरिकांनी आपल्यातलाच एक सामान्य माणूस आमदार असल्याची भावना जनतेमध्ये आज निर्माण झाली आहे. आमदार राजूमामा भोळे हे जळगावकरांना २४ तास ३६५ दिवस एखाद्या हेल्प लाईन प्रमाणे केव्हाही कुठेही उपलब्ध असतात. असा हा जमिनीवरचा आमदार काही विशिष्ट लोकांच्या डोळ्यात खुपत आहे. मात्र युतीचे नेते व जनता कुठल्याही भूलथापांना आता कोणीही बळी पडणार नाही. यामुळे जळगावची जागा भाजप कधीही सोडणार नसल्याचे या पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

Protected Content