जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटवाच ; उद्धव ठाकरेंची आग्रही मागणी

Uddhav ayodhya

 

मुंबई (वृत्तसंस्था) काश्मिरात व्यापार-उद्योग वाढवायचा असेल तर कायदे बदलावे लागतील व त्यासाठी ३७० कलम रद्द करावे लागेल. देशाच्या संसदेने लागू केलेला कायदा जम्मू-काश्मिरात लागू होत नाही. हा आमच्या संसदेचा अपमान ठरतो. संसद सर्वोच्च आहे. देशाच्या इंच इंच भूमीवर संसदेचा अधिकार आहे, पण जम्मू-काश्मीर, लडाख वगळून! हा संविधानाचा तमाशा थांबवायचा असेल तर ३७० कलम हटवणे हाच मार्ग आहे व गृहमंत्र्यांनी तसे संकेत दिले आहेत,’ असे सांगतानाच जम्मू-काश्मिरातून ३७० कलम हटवाच, अशी जोरदार मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून केली आहे.

 

जम्मू-काश्मीरची समस्या ही पाकिस्तानात नसून प्रत्यक्ष आपल्या देशात आहे. जम्मू-काश्मीरात राष्ट्रपती राजवटीची मुदत सहा महिने वाढवण्यात आली. पुढील सहा महिन्यांत खोऱ्यातील वातावरण ठीकठाक केले जाईल. अमरनाथ यात्राही सुरू झाली आहे. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेवर ताण आहे. त्यानंतर विधानसभा निवडणूक होईल. कश्मीरातील मुख्य मुद्दा निवडणुका नसून 370 कलम हटवणे हा आहे. या कलमाने काश्मीरला जो विशेष दर्जा दिला आहे तो भारताचे स्वातंत्र्य आणि अखंडतेस छेद देणारा आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत ठणकावून सांगितले की, ‘370 कलमाची व्यवस्था तात्पुरती आहे.’ याचा दुसरा अर्थ असा की, मोदी राजवट दिलेल्या शब्दास जागेल. भारताच्या पाठीत घुसलेला हा खंजीर काढला जाईल, पण कश्मीरचे नेते म्हणवून घेणाऱ्या फारुख अब्दुल्लांसारख्या लोकांनी 370 कलम हटविण्यास फक्त विरोध केला नाही, तर फुटून निघण्याची अप्रत्यक्ष भाषा केली. अब्दुल्ला म्हणतात, 370 कलम तात्पुरते असेल तर कश्मीरचा भारतातील विलयदेखील तात्पुरताच समजा. याचा दुसरा अर्थ असा की, 370 हटवाल तर याद राखा! तिकडे दुसऱ्या नेत्या मेहबुबा मुफ्तीही फुदकल्या आहेत. भारताचा कायदा, घटना न मानता कश्मीरचे स्वतंत्र अस्तित्व राखावे. आमचा हिंदुस्थानशी संबंध नाही. आम्ही तुमच्यापेक्षा वेगळे आहोत. आमचे लाड थांबवाल तर पाकिस्तान आम्हाला मांडीवर बसवायला तयार आहे अशा आरोळय़ा मारणाऱ्यांनी आता समजून घेतले पाहिजे की, दिल्लीत मोदींचे राज्य आहे.

 

काश्मीरमध्ये शांतता विकत घेण्याचे दिवस संपले आता दहशतवाद आणि धमक्यांना भीक न घालणारे सरकार आले. कश्मीरला गेल्या साठ-सत्तर वर्षांत देशाने भरपूर दिले. काश्मीरातील नवतरुण म्हणवून घेणाऱ्यांच्या हाती दगड आहेत आणि आमच्या सैन्यावर ते फेकले जातात. तेथील तरुणांच्या हातास काम नसल्याने ते ही दगडफेक करतात, असा दावा मेहबुबा मुफ्ती यांच्या पक्षाचे नेते करतात तो हास्यास्पद आहे, या सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे. आपण भारतात राहतो म्हणजे तुमच्यावर मोठे उपकारच करतो ही भावना आधी मोडून काढायला हवी. पाकिस्तान हा कंगाल झालेला देश. आता त्यांच्या कटोऱ्यात कुणी भीक टाकायला तयार नाही. दिवाळखोरी हेच त्यांचे भवितव्य आहे. तेथील जनता नरकयातना भोगत आहे. हे काय आमच्या काश्मिरातील लोकांना कळत नसावे? ते येथेच सुखात आहेत. मोदी आल्यापासून व आधीही हजारो कोटींची विकासकामे जम्मू-काश्मिरात होत आहेत ती कुणासाठी?

Protected Content