मुंबईत एटीएसने केली चार बांग्लादेशी नागरिकांना अटक

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भारतीय पारपत्र मिळवून मुंबईत राहणाऱ्या चार बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात दहशतवाद विरोधी पथकाला (एटीएस) यश आले आहे. गंभीर बाब म्हणजे आरोपींपैकी एक जण या पारपत्राच्या आधारे परदेशात नोकरीला गेल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपींनी बेकायदेशिररित्या भारतीय नागरिकत्त्व मिळवून लोकसभा निवडणुकीसाठी मतदानही केल्याची बाब निदर्शनास आली आहे. याप्रकरणी एटीएस अधिक तपास करीत आहे.

एटीएसच्या जुहू कक्षाला मिळालेल्या माहितीच्या आधारे एका बांगलादेशी नागरिकाला ताब्यात घेण्यात आले होते. तपासात काही आरोपींनी भारतीय पारपत्र मिळवल्याचे समजले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी रियाज हुसेन शेख, सुलतान सिध्दीक शेख, इब्राहिम शफिउल्ला शेख व फारूख उस्मानगणी शेख यांना अटक केली. आरोपींविरोधात बेकायदेशीररित्या भारतात वास्तव्य करीत असल्याबाबत मुंबईत गुन्हे दाखल असून गुजरातमधील सूरत येथे वास्तव्याला असताना त्यांनी पारपत्र प्राप्त केले होते. या आरोपींप्रमाणेच अन्य पाच जणांनी अशा प्रकारे पारपत्र मिळवले असून त्यापैकी एक जण या पारपत्राच्या आधाराने सौदी अरेबिया येथे नोकरीसाठी गेल्याचे तपासात निष्पन्न झाले. तसेच काही आरोपींनी पारपत्राच्या आधारे लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केल्याचेही उघड झाले आहे.

भारतीय असल्याचे सिद्ध करण्यासाठी, तसेच परदेशात नोकरी मिळविण्याच्या उद्देशाने बांगलादेशी नागरिक भारतीय पारपत्र मिळवित असल्याचे तपासणीत निष्पन्न झाले आहे. या प्रकरणातील आरोपींचा दहशतवादी कृत्यांशी संबंध आहे का याबाबत तपास सुरू आहे. चारही आरोपींना न्यायालयालयासमोर हजर करण्यात आले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

गुन्हे शाखेने यापूर्वी अक्रम नूर नवी शेख (२६) याला अटक केली होती. तो मूळचा बांगलादेशातील चितगाव राज्यातील नोरत्तमपूर येथील रहिवासी आहे. अक्रम सध्या मुंबईतील वडाळा परिसरात राहत होता. आरोपी स्वतःही बांगलादेशातून बेकायदेशीररित्या भारतात आला होता. भारतात आल्यानंतर आरोपीने त्याचा साथीदार शफीक याच्यासह बांगलादेशातील नागरिकांना बेकायदेशीररित्या येथे आणण्यास सुरुवात केली. भारतात बेकायदेशीररित्या प्रवेश देऊन मुंबई परिसरात कामधंदा मिळवून देण्याचे काम अक्रम करीत होता. त्यासाठी तो प्रति व्यक्ती २० हजार रुपये घेत असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. तसेच अक्रम कमिशन घेऊन या नागरिकांनी भारतात कमावलेली रक्कम बांगलादेशात पाठवण्याचेही काम करीत होता. अक्रम शिवडी स्थानकाजवळ येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे बांगलादेशात रक्कम पाठवण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीमार्फत अक्रमशी संपर्क साधण्यात आला. तो शिवडी येथे आल्यानंतर त्याला गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली.

Protected Content